कुर्ला : दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने सपासप वार, 2 सराईत गुन्हेगार गजाआड

कुर्ला : पोलीसनामा ऑनलाइन – दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने एकावर सपासप वार केल्याची घटना कुर्ला येथील विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. ही घटना 13 मार्च 2021 रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला होता. मात्र, आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर पोलिसांनी दोन आरोपींना शिताफिने अटक केली. पूर्वी झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे तपासात समोर आले आहे.

दत्ता मंगेश पाटील उर्फ शेरु (वय-27) आणि कृष्णा मंगेश पाटील उर्फ काळ्या (वय-25) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर कुर्ला, वि.भा.नगर पोलीस ठाण्यात एकूण 22 गुन्हे दाखल आहेत. मागील दोन वर्षापासून वि.भा.नगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या तीन गुन्ह्यात आरोपी फरार होते. आरोपींची बैल बाजार, संदेश नगर परिसरात दहशत असून ते या ठिकाणच्या व्यापारी, दुकानदार, फेरीवाले यांना चाकूचा धाक दाखवून पैसे लुटत होते.

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते. मात्र, आरोपी कृष्णा पाटील हा आपले राहण्याचे ठिकाण सतत बदल असल्याने आणि मोबाईल क्रमांक बदलत असल्याने पोलिसांना सापडत नव्हता. आरोपी कृष्णा पाटील हा आपल्या साथिदारांना व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगद्वारे संपर्क करत होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्यास पोलिसांना अडथळा येत होता. अखेर पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपी कृष्णा पाटील याला 1 मे रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास कोपर रेल्वे स्थानकाबाहेर शिताफीने अटक केली.

तर या गुन्ह्यातील दुसरा आरोपी दत्ता पाटील हा नुकताच घाटकोप पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये शिक्षा भोगून जामिनावर बाहेर आला होता. पूर्ववैमनस्यातून हा गुन्हा केल्याचे तपास समोर आले. आरोपी दत्ता पाटील याला गोवंडी बडी मस्जिद परिसरात सापळा रचुन अटक करण्यात आली. आरोपींवर वि.भा.नगर, साकीनाका, घाटकोपर व आजूबाजूच्या परिसरात मारामारी, लुटमारी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई मध्य प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक, कुर्ला विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश जाधव, वि.भा. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती रढे, तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक अजय क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक धुतराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक तायडे, पद्माकर पाटील, पोलीस हवालदार दिपक खरटमल, पोलीस नाईक सुनिल पाटील, चंद्रकांत पवार, संदीप पाटील, श्रीकांत उबाळे, अनिल शिंदे, वैभव पुजारी राजेश राठोड यांच्या पथकाने केली.