कोथळे ते जेजुरी रस्ता बनला मृत्यूचा सापळा

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – ( संदीप झगडे )-  सप्टेंबर महिन्यात पडलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे पुरंदर तालुक्यातील फुटनदीला पूर आला. नदीचा प्रवाह इतका वेगाने होता, की या नदीवरील जेजुरीला जोडणारा कोथळे येथील रस्ताच वाहून गेला आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावरून खंडोबा देवाची सोमवती पालखी मार्गस्थ होते .पुराने हा रस्ता वाहून जाण्याच्या घटनेला आता दोन महिने झाले तरी अद्याप प्रशासनाने ही देवाकडे जाणारी वाट दुरुस्त केली नसल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे . १७ ते २५ सप्टेंबरदरम्यान पुरंदर

तालुक्याच्या पूर्व भागात सायंकाळी अचानक ढगफुटी झाली. त्यामुळे नदीला प्रचंडपूर आला. नदीकाठच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली. तसेच नदीकाठच्या गावातील लोकवस्तीत पाणी शिरले लोकांच्या घरांचे व संसार उपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचवेळी अनेक रस्तेही वाहून गेले.

जेजुरी शहराला जोडणारा कोथळे जेजुरी हा रस्ता तर मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्ता जवळजवळ अर्धा वाहून गेला कोथळे, रानमळा, भोसलेवाडी, जगताप वस्ती,या लोकांसाठी हा रस्ता म्हणजे जीवन वाहिनीच आहे. या गावातून अनेक लोक जेजुरी औद्योगिक वसाहतीत नोकरीसाठी जातात. तसेच मुले शाळा, महाविद्यालयात शिक्षणासाठी याच रस्त्यावरून ये-जा करत असतात.

शेतकरी आपला माल विकण्यासाठी याच रस्त्याने जातात रस्त्याची दुरवस्था एवढी झाली आहे की, लोक आपला जीव मुठीत घेऊन या रस्त्याने ये- जा करत आहेत. याठिकाणी अनेक प्रकारचे किरकोळ अपघात झाले आहेत. मुले शाळेतून घरी येईपर्यंत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी लोकांची मागणी आहे.

Visit : Policenama.com