काय सांगता ! होय, ‘लॉकडाऊन’ दरम्यान चक्क ‘कॉलगर्ल’ला घरी बोलावलं, ‘या’ दिग्गज खेळाडूवर आता होणार कारवाई

पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना व्हायरस या साथीच्या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून जगातील बहुतेक देशांमध्ये लॉकडाउन करण्यात आले आहे. भारतातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे, जो 14 एप्रिलला संपेल. असे असूनही, काही लोक लॉकडाऊनच्या गांभीर्याकडे सतत दुर्लक्ष करत आहेत. इंग्लंडमध्येही असेच एक प्रकरण समोर आले आहे. जिथे मँचेस्टर सिटीचा फुटबॉलर काइल वॉलकर शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जात आहेत.

मँचेस्टर सिटी करणार शिस्तभंगाची कारवाई
इंग्लंडचा फुटबॉलर काइल वॉकरने लॉकडाऊनचे उल्लंघन केले. माहितीनुसार, या 29 वर्षीय खेळाडूने गेल्या आठवड्यात आपल्या घरी पार्टी केली होती, ज्यात दोन कॉलगर्ललाही आमंत्रित करण्यात आले होते. सामाजिक अंतर कायम राखण्याच्या सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वॉकरने रविवारी दिलगिरी व्यक्त केली असली तरी त्याचा क्लब मॅन्चेस्टर सिटी यामुळे तीव्र नाराज आहे. क्लबने स्पष्टपणे सांगितले की, वॉकरच्या या वृत्तीमुळे आम्ही अत्यंत निराश आहोत आणि त्याच्याविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.

काइल वॉकरने जाहीरपणे माफी मागितली असताना एका निवेदनात म्हटले आहे की, ‘गेल्या आठवड्यात मी जे केले त्याबद्दल मी जाहीरपणे माफी मागतो. एक रोल मॉडेल म्हणून व्यावसायिक फुटबॉलर म्हणून माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत हे मला समजले आहे, म्हणून मी माझ्या कुटूंबाची, मित्र, फुटबॉल क्लब, समर्थक आणि जनतेची माफी मागतो.’ दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूमुळे सुमारे 5000 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 46,000 लोक संक्रमित आहेत. यामुळे देशात तीन आठवड्यांचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

वॉकरने आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला
अहवालानुसार त्या दोन कॉलगर्लपैकी एकीने सांगितले की, ती रात्री साडेदहा वाजता टॅक्सीने वॉकरच्या घरी पोहोचली. वॉकरने आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला आणि आपले नाव काई सांगितले. लॉकडाउनचे उल्लंघन करणारा वॉकर हा पहिला फुटबॉलपटू नाही. अ‍ॅस्टन व्हिलाचा कॅप्टन जॅक ग्रीलिशने देखील त्याच्या आधी हे काम केले आहे. काही दिवसांपूर्वी जॅक आपल्या चाहत्यांना घरी रहाण्याचे आवाहन करून रस्त्यावर पार्टी करताना दिसला.