मजुरी करणाऱ्या महिलेच्या रस्त्याकडेला झोपलेल्या बाळाला गाडीने चिरडले

सूरत : गुजरात वृत्तसंस्था – रस्त्यावर रोजच अपघात होत राहतात. परंतु काही अपघात मनात हळहळ माजवतात. असाच एक दुःखदायक प्रकार गुजरात राज्यातील सुरत या ठिकाणी घडली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि मुलांच्या उज्वल भविष्याच्या जडण घडणीसाठी अनेक मुजर रस्त्यावर काम करत असतात. परंतु हे रस्त्यावरील काम मुलाचा जीव हिरावून घेऊन जाते तेव्हा त्या मजूर आई वडिलांवर कोसळणारे दुःख हे शब्दात बंधिस्त करणे कठीणच असते.

सूरतमध्ये व्हीआयपी रोड समोरील सर्व्हिस रोड नजीक सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. या कामावर काम करणाऱ्या एका महिलेने आपल्या बाळाला रस्त्याच्या कडेला गटारीच्या चेंबरवर झोपवले. त्याच्या अंगावर कापडाचा एक तुकडा टाकला आणि ती महिला कामाला निघून गेली. एका भरधाव आलेल्या गाडी चालकाला कपड्याखाली झाकलेल्या बाळाचा अंदाज आला नाही आणि त्याने त्या चिमुरड्याला चिरडून टाकले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाळाच्या हृदयाची धुडधूड सुरू होती. म्हणून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्या बाळाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आपल्या बाळाच्या मृत्यूची बातमी समजताच रुग्णालयातच त्या बाळाच्या आईने आक्रोश मांडला. हातावरचे पोट असणाऱ्या लोकांचे असे विदारक दुःख पाहून रुग्णालयातील लोकांचे हि डोळे ओलावले होते. संदीप गुप्ता असे त्या गाडी चालकाचे नाव आहे.

खटोदरा पोलीस ठाण्यात गाडी चालक संदीप गुप्ता याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या वर मनुष्य वधाचे कलम लावण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अरुण पारगी या महिलेने बाळाला दूध पाजले. दूध पाजल्या नंतर ते बाळ झोपले त्याला ऊन लागू नये म्हणून तिने रस्त्याच्या कडेला टाकलेल्या बाळाच्या अंगावर कपडा टाकला. कपड्याच्या खाली असणारे बाळ चालकाला दिसले नसल्याने चालकाने त्याच्या अंगावर गाडी घातली त्यामुळे हि दुर्घटना घडली आहे. तर प्रत्यक्षदर्शनी लोकांनी दिलेल्या माहिती नुसार घटना घडल्या नंतर हा गाडी चालक १० मीटर अंतरावर जाऊन उभा राहिला. घटना स्थळी गर्दी वाढू लागल्याने त्याने तेथून पळ काढला.