चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळा हेच ‘कोरोना’चे ‘उगम’स्थान : डोनाल्ड ट्रम्प

पोलिसनामा ऑनलाईन टीम – जगभरात पसरणार्‍या कोरोनाचे उगमस्थान चीनच्या वुहान शहरातील विषाणूशास्त्र प्रयोगशाळा हे आहे. त्यामुळे तेथून विषाणूचा जगभर फैलाव झाला, या विषाणूने आतापर्यंत 2 लाख 33 हजारांहून अधिक बळी घेतले असून जागतिक अर्थव्यवस्था खिळखिळी केली आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

वुहानमधील प्रयोगशाळेतील अपघातामुळे बाधित प्राण्यांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा फैलाव झाला असे अद्याप आमच्या तपासामध्ये आढळले नाही, असे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. वुहान विषाणूशास्त्र संस्था हेच कोरोनाचे उगमस्थान आहे असे काही आपल्या निदर्शनास आले आहे का, असे ट्रम्प यांना एका वार्ताहराने विचारले असता ट्रम्प यांनी होकारार्थी उत्तर दिले.

मात्रा त्यांनी तपशील देण्यास नकार दिला. तपास सुरू असून त्यामधून काय निष्पन्न झाले ते जाहीर केले जाईल, असे ट्रम्प म्हणाले. दरम्यान, जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले असून नागरिक चिंतेत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाची धास्ती वाढत चालली असल्यामुळे संबंधित देश चिंतातूर झाले आहेत. कोरोना विषाणूची लस शोधण्यास अद्यापही कोणत्या देशाला यश मिळाले नाही.