देशात ‘मंदी’ असताना केंद्रीय रोजगार राज्यमंत्र्यांचे ‘बेताल’ वक्तव्य (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात मंदीसदृश्य वातावरण असताना अनेकजण बेरोजगार होत असताना केंद्रीय रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी बेताल वक्तव्य केले असून नेटकऱ्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केले आहे. रोजगार आहेत, मात्र लोकच शिकलेले नाहीत असे वक्तव्य गंगवार यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी प्रतिक्रीया व्यक्त केली जात आहे. रोजगार देऊ नका, मात्र किमान बोलू तरी नका अशी प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहे.

संतोष गंगवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले आहेत. देशात मंदी असताना रोजगार मंत्र्यांनी अभ्यास करून बोलणे अपेक्षीत आहे. मात्र, गंगावार यांनी तस न करता, देशात रोजगाराच्या संधी आहेत, रोजगाराची काहीच कमतरता नाही, मात्र, त्या पात्रतेचे लोकच शिकलेले नाहीत. त्यामुळे त्यांना रोजगार मिळत नाही, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे नेटकऱ्यांनकडून त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान देशात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याची आकडेवारी समोर आली होती. त्यानंतर आता मंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. देशात वाहन उद्योगात मोठ्या प्रमाणावर रोजगार गेले आहेत. जागतिक मंदी आणि सरकारच्या काही धोरणांमुळे देशात आर्थिक क्षेत्रात मंदीचे वातावरण नसल्याचे म्हटले जात आहे. देशांतर्गत बाजारात मालाला उठाव नसल्याने उद्योगधंदे मंदावले आहेत.

केंद्रीय रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार हे सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर त्यांनी सारवासारव केली आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असे सांगत मला वेगळ सांगायचे होते. ज्या स्किलची गरज आहे, त्या स्किलचे प्रशिक्षण दिले पाहिजे तरच त्या शिक्षणाला अर्थ राहील असे आपल्याला सांगयचे होते असे त्यांनी स्पष्ट केले.