20 दिवसांची मेहनत, दाम्पत्याने खोदली 15 फुट खोल विहीर, बनले ‘आत्मनिर्भर’

सतना : कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर अतिशय वाईट परिणाम झाला आहे. कमजोर अर्थव्यवस्थेला तोंड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांना कुणावरही अवलंबून न राहता आत्मनिर्भर होण्याचे आव्हान केले आहे. अशाच प्रकारच्या विचाराने मध्यप्रदेशच्या सतना जिल्ह्यातील पिंडरा गावातील बरहा मवान वस्तीत एका आदिवासी दाम्पत्याने मोठे काम केले आहे. जे पाहिल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित होत आहेत.

या आदिवासी दाम्पत्याने सरकारवर अवलंबून न राहता कसे आत्मनिर्भर व्हावे, हे दाखवून दिले आहे. दोघांनी 20 दिवस खुप मेहनत करून 15 फुट खोल आणि साडेपाच फुट रूंद अशी विहीर खोदली आहे. दोघांनी घरात भाजीसुद्धा उगवण्यास सुरूवात केली आहे. या आदिवासी दाम्पत्याचे म्हणणे आहे की, कुणापुढे हात पसरण्यापेक्षा, आत्मनिर्भर बनावे.

उन्हाळा सुरू होताच मझगवा ब्लॉकमधील सर्वात मोठी ग्रामपांचायत असलेल्या पिंडरा आदिवासी बहुल गाव बरहा मवानमध्ये भीषण पाणी संकट उभे राहते. येथे केवळ 70 घरे आहेत. लॉकडाऊनमध्ये कामधंदा सोडून घरी बसलेला छोटू मवासी आणि त्याची पत्नी राजलली मवासी यांनी विचार केला की, वेळ मिळाला आहे तर जलसंकटाशी दोन हात करूयात. या विचारानंतर पती-पत्नीने घराच्या पाठीमागच्या भागात विहीर खोदण्यास सुरूवात केली.

ही विहीर खोदण्यास 20 दिवस लागले, जमीनीखाली मोठ-मोठे दगड होते जे हाताने फोडावे लागले. हे काम सोपे नव्हते, परंतु, या आदिवासी दाम्पत्यासमोर हे दगड टिकू शकले नाहीत. जेव्हा या विहीरीला पाणी लागले तेव्हा दाम्पत्याला प्रचंड आनंद झाला. पाण्याचे संकट दूर झाल्यानंतर आता त्यांनी घरीच भाजीची लागवड सुरू केली आहे.

छोटू मवासीने सांगितले की, कोरोनामळे मी आणि माझ्या पत्नीने ठरवले की घरी बसलो आहोत तर विहीर खोदूयात. येथे पाण्याची समस्या खुप आहे, याचा विचार करून हा निर्णय घेतला. यांनतर आम्ही छोटी बागसुद्धा तयार केली आहे. मझगवामध्ये जे काम होते ते सुद्धा बंद झाले आहे. रिकामे बसण्यापेक्षा काही तरी करावे, असा विचार केला आणि आम्ही दोघांनी विहीर खोदली.

छोटू मवासीचे म्हणणे आहे की, विहीर खोदण्यासाठी 20 दिवस लागले. जर प्रशासनाने मदत केली तर ही विहीर पक्की होऊ शकते. यामुळे गावकर्‍यांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास होणार नाही. या गावाला आजपर्यंत एकही सरकारी लाभ मिळालेला नाही, ना कुणी लक्ष दिले आहे.

छोटूची पत्नी राजलली मवासी म्हणाली, आम्ही आमच्या बळावर विहीर खोदली आहे. आता चिंता नाही. आता कुणावरही अवलंबून राहावे लागणार नाही. आम्ही भाजीसुद्धा लावली आहे. यामुळे संकटाच्या या काळात खुप मदत होईल.