कधी काळी केलं होतं LIC एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मंगळवारी (29 सप्टेंबर 2020) आयआयएफएल वेल्थ हुरून इंडियाच्या 2020 सालातील धनाड्यांची यादी असलेला अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत किती वाढ आणि घट झाली यासंदर्भातही सविस्तर माहिती या अहवालात आहे. खास बात अशी की, या अव्वल 10 श्रीमंतांपैकी 7 जण हे महाराष्ट्रात राहणारे असल्याचं स्पष्ट झालं आहे. आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट 2020 मध्ये अनेक भारतीय उद्योगपतींना स्थान मिळालं आहे. यापैकी एक नाव चकित करणारं असं आहे. सोनालिका ट्रॅक्टरचे मालक लक्ष्मणदास मित्तल यांना श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळालं आहे. ते या यादीत 164 व्या स्थानावर आहेत.

भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी हे पहिल्या स्थानावर आहेत. त्यांची वैयक्तीक संपत्ती ही 2,77,700 कोटी रुपयांवरून 6,58,400 कोटी रुपयांवर गेली आहे. ते सलग नवव्या वर्षी हुरून इंडिया यादीतील सर्वात श्रीमंत भारतीय म्हणून अव्वल स्थान सांभाळून आहेत.

वैभवाला गळती लागलेलेंच्या यादीत हिंदुजा बंधू अव्वल स्थानी असले तरी ते श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. एकूण संपत्तीत 23 टक्के घसरण झाल्यानंतरही हिंदुजा बंधूंची संपत्ती 1 लाख 43 हजार 700 कोटी एवढी आहे. हिंदुजा बंधू हे महाराष्ट्र, युके आणि स्वित्झर्लंडमध्ये राहतात.

एचसीएल टेकचे शिव नाडार यांच्या धनवैभवात 34 टक्के वाढ झाली आहे. दिल्लीत राहणारे नाडार श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. नाडार यांची एकूण संपत्ती 1 लाख 41 हजार 700 कोटी एवढी आहे. तिसऱ्या स्थानी असणारे नाडार हे मागील वेळेस पाचव्या स्थानावर होते. नाडार हे 75 वर्षांचे आहेत.

सोनालिका ग्रुपचे चेअरमन लक्ष्मणदास मित्तल या यादीत 164 व्या स्थानावर आहेत. ते 89 वर्षांचे आहेत. त्यांचा जीवनप्रवास हा खूप खडतर आहे. पंजाबमधील होशियारपूर येथे राहणाऱ्या मित्तल यांनी 1962 मध्ये थ्रेसर बनवण्यापासून सुरुवात केली होती. त्यापूर्वी त्यांनी एलआयसी एजंट म्हणूनही काम केलं होतं.

आधी तर थ्रेसर बनवण्याचा व्यवसाय चालला नाही. त्यामुळं व्यवसाय नुकसानीत जात असल्याकारणानं लक्ष्मणदास यांनी एकदा वडिलांना रडताना पाहिलं होतं. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा थ्रेसर बनवण्याचं काम सुरू केलं आणि पुढे जाऊन त्यांनी सोनालिका ग्रुपची पायाभरणी केली. आज सोनालिका ग्रुप भारतातील तिसऱ्या क्रमांकाची ट्रॅक्टर निर्माता कंपनी आहे.