पत्नीच्या कुंडलीत मंगळ नसल्याने पतीने चढली चक्क कोर्टाची पायरी

पोलीसनामा ऑनलाईन : पत्नीच्या कुंडलीत मंगळ ग्रह नाही, त्यामुळे आपल्याला पत्नीकडून घटस्फोट घ्यायचा असल्याची याचिका नागपूरच्या एका व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने संबंधित व्यक्तीला खडेबोल सुनावले आहेत. कुंडलीत मंगळ नाही, हे घटस्फोटाचे कारण असू शकत नाही. तसेच कुंडलीत मंगळ नसल्याची बाब लपवणे हा छळ केल्याचा प्रकार नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. नागपूर कौटुंबिक न्यायालयाचा निकाल योग्य असल्याचे सांगत न्या. अतुल चांदूरकर आणि न्या. नितीन सुर्यवंशी यांनी महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

याबाबतची माहिती अशी की, नागपूर येथील दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या एका 37 वर्षीय  तरुणाला पत्नीच्या कुंडलीत मंगळ नाही हे कळले. ही गोष्ट तिने आणि तिच्या घरच्यांनी आपल्यापासून लपवून ठेवल्याचा आरोप करत घटस्फोटासाठी संबंधित व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 2007 मध्ये जेंव्हा लग्न झाले त्यावेळी मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीच्या कुंडलीत मंगळ असल्याची खोटी माहिती दिल्याचा आरोप पतीने केला होता. यानंतर पतीने हुंड्यासाठी पत्नीचा छळ करायला सुरुवात केली. दरम्यान, पत्नीने मुलीला जन्म दिल्याने सासरच्या मंडळीने अजूनच छळ करायला सुरुवात केली. त्यानंतर संबंधित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.