बाजारात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा लोकांचे ‘हाल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बाजारात धान्य, भाज्या, दूध, बेकरी प्रॉडक्ट्स अशा वस्तुंचा तुटवडा जाणवत असल्याने लोकांची मोठी गैरसोय झाली. सरकारच्या वतीने लोकांना आवाहन केले होते की, गर्दी टाळा, घाबरून जावू नका, गोंधळ होईल असे काही करू नका. संचारबंदी जाहीर केली असली तरी, सगळ्यांना जीवनावश्यक वस्तू व्यवस्थित मिळतील.

प्रत्यक्षात लोकांची प्रचंड गैरसोयच झाली. धान्याची अनेक दुकाने बंद होती. भाजी-पाला विक्रीची दुकाने तुरळक चालू होती. पण, तुटवड्याचा फायदा घेऊन दुकानदारांनी दुप्पट, तिप्पट किमतीत भाज्या विकल्या. अनेक ठिकाणी दूधही मिळत नव्हते. मध्यवस्तीतील ग्राहक पेठही बंद होती. पोलीस दुकाने उघडू देत नाहीयेत अशा तक्रारी व्यापाऱ्यांनी केल्या. तर काही ठिकाणी माल शिल्लक नाही तसेच कामगारही येऊ शकले नाहीत त्यामुळे दुकान बंद आहे असे फलक दुकानांवर लावले होते.

पुण्यात अनेक मंदिराबाहेर दुपारी अन्नदान केले जाते, दानशूर मंडळी संस्था अन्नदान करतात. शेकडो जणयाचा लाभ घेतात. सध्या अन्नदान बंदच असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

येत्या दोन, तीन दिवसात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुरेशा प्रमाणात सुरू झाला नाही तर परिस्थिती अजूनच बिकट होईल. पाडव्याच्या दिवशीच लोकांना वस्तूंसाठी वणवण फिरूनही पदरी निराशाच आली.