पन्नास हजाराची लाच घेताना पालिका कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

मुंबई पोलीसनामा ऑनलाईन

महात्मा गांधी पथ क्रांती योजने अंतर्गत महापालिकेने रहिवाशांना पर्यायी घरे मंजूर केली आहेत. या घराच्या वाटप पत्रासाठी एका अर्जदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पालिका कामगारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून जेरबंद केले आहे.

याप्रकरणी मुंबई महानगर पालिका कामगार अशोक आनंदा रोकडे (वय ४२,एफ.साऊथ वॉर्ड, परेल, मुंबई.) यास लाच प्रकरणी अटक केली आहे. तसेच रोकडे तर्फे लाच स्वीकारणारा खासगी व्यक्ती साजिद जब्बार खान (वय ४८) यास पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी पात्र अर्जदाराच्या सामाजिक कार्यकर्ता असलेल्या ४९ वर्षीय मित्राने पोलिसांना ही माहिती दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर पालिकेमधील साऊथ वॉर्ड ,परेल मुंबई कार्यालयात काम करणारा कामगार रोकडे याने महात्मा गांधी पथ क्रांती योजने अंतर्गत घर मिळण्याकरिता पात्र होण्यासाठी तीन लाख रुपये घेतले होते. यांनतर घराचे वाटप पत्र देण्यासाठी अर्जदारास पुन्हा ५० हजाराची मागणी केली होती. अर्जदाराचा मित्र असलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याने ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळवली. यानुसार पोलिसांनी मंगळवार दि.१५ रोजी सापळा लावून पालिका कामगार असलेल्या रोकडेसाठी काम करणाऱ्या खासगी इसम साजिद खान यास ५० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले.यानंतर पोलिसांनी रक्कम जप्त केली असून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.