Coronavirus : ‘कोरोना’विरूद्धच्या लढाईत कोणत्याही निधीची कमतरता भासणार नाही, राज्यांना देण्यात आले 11,092 कोटी रुपये

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोनाविरूद्धच्या लढाईत राज्यांसाठी निधीची कमतरता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यात निधीअभावी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर गृहमंत्रालयाने शुक्रवारी 11,092 कोटी रुपये जाहीर केले. हे पैसे थेट राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीकडे जातील.

आपत्ती व्यवस्थापन निधीत तातडीने निधी देण्यासाठी गृहमंत्र्यांनी दिला ग्रीन सिग्नल

गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यांना 2020-21 च्या आपत्कालीन व्यवस्थापन निधीची रक्कम अ‍ॅडव्हान्स मध्ये जारी करण्याचे आदेश दिले. कोरोनाशी लढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन निधीचा वापर करण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत.

विशेष रुग्णालये तयार करण्यासाठी आणि आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्यांना सूट

14 मार्च रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये आपत्ती व्यवस्थापन निधीला कोरोनाविरूद्ध तत्परतेने वापरण्यास परवानगी देताना विशेष रूग्णालये बनविण्यापासून अत्यावश्यक उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करण्यास सांगितले गेले. त्यानंतर 24 मार्च रोजी लॉकडाऊननंतर, मोठ्या संख्येने स्थलांतर करणाऱ्या मजुरांना परत येण्यापासून रोखण्यासाठी आणि त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी राज्यांना हा निधी वापरण्यास परवानगी देण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या युद्धात निधीची कमतरता असल्याचा मुद्दा उपस्थित केला

गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग दरम्यान अनेक मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या युद्धात निधी नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की राज्यांच्या आपत्ती व्यवस्थापन निधीमध्ये पुरेसा निधी उपलब्ध नाही. आपत्ती व्यवस्थापन निधीसाठी 2020-21 साठी आगाऊ वाटप करण्याची मागणी त्यांनी केली. दुसर्‍याच दिवशी गृह मंत्रालयाने हा निधी आगाऊ जाहीर केला.

तबलीगी जमातच्या कृत्यामुळे कोरोनाचा कहर लांबू शकतो

तबलीगी जमातच्या कृत्यामुळे कोरोनाचा कहर अधिक काळ सुरु राहू शकतो. भारतात आता याचे पडसाद एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे च्या पहिल्या आठवड्यात दिसू शकतात. सरकारला कोरोनाविरूद्धच्या लढाईत बरेच यश मिळत होते, परंतु तबलीगी जमातने सर्व कामगिरीवर पाणी फेरले आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, गेल्या दोन दिवसांत तबलीगी जमातशी संबंधित कोरोनाचे 647 रुग्ण उघडकीस आले आहेत.