पुण्यात ऑक्सिजन सिलेंडर आणि अ‍ॅम्ब्युलन्सची कमतरता, अजित पवारांची ‘कबुली’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर याचा परिणाम झाला आहे. सोई-सुविधांवर ताण येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्याची बैठक झाली. पुण्यात ऑक्सिजन सिलेंडर आणि अ‍ॅम्ब्युलन्सची कमतरता आहे, काही चुका झाल्या आहेत, अशी कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, ऑक्सिजन सिलेंडर जेवढे पाहिजे तेवढे मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अ‍ॅम्ब्युलन्सच्या तक्रारी मान्य आहेत. जम्बो वर अचानक जास्त रुग्णांचा भार पडला. त्यामुळे व्यवस्था कोलमडली ही वस्तुस्थिती आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच ससूनमध्ये ऑक्सिजन तुटवड्याची अडचण आल्याने रुग्णांना जम्बोत पाठवले. पुण्यात लॉकडाऊन उठवण्यावरून सीएमची वेगळी भूमिका होती. पण पुण्यातील व्यापारी आक्रमक होते. म्हणून लॉकडाऊन उठवल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

अनेक लोकप्रतिनिधी कोरोना बाधित झाले आहेत. साथ वाढत आहे हे वास्तव आहे. संख्या लाखावर गेली असली तरी 82 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत हे देखील सांगितले पाहिजे, असेही ते म्हणाले. पुण्यात झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.