क्रीडा मैदानावरील लाखोंचा खर्च पाण्यात, देखरेखीअभावी क्रीडाप्रेमी व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील तुळजाभवानी क्रीडा संकुलात क्रीडाप्रेमी, खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांच्या दर्जाहिन कामामुळे मैदानाची मोठी दुरावस्था झाली आहे. रंगरंगोटी, लाल माती, दिवाबत्ती, पाण्याची सुविधा तसेच ओपन जीमचे साहित्य दर्जाहिन असल्याने त्याची सहा महिन्यातच वाट लागली आहे. क्रीडा विभागाने मैदानातील सोयीसुविधा आणि साफसफाईकडे दुर्लक्ष केल्याने लहान बालके, महिला, ज्येष्ठांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मैदानातील या सर्व गैरसोयी दूर कराव्यात, अशी मागणी क्रीडाप्रेमी नागरिकांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल हेच एकमेव मैदान खेळाडू, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य नागरिक, महिला व बाल खेळाडूंना सोयीचे आहे. शासनाने येथील सोयी-सुविधांवर लाखो रूपये खर्च केले आहेत. परंतु केवळ जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे मैदानाची दुरावस्था झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच येथील मैदानावर ओपन जीम निर्माण केली होती. अवघ्या सहा ते सात महिन्यात जीमचे दर्जाहिन साहित्य निकामी झाले आहे. मैदानावर लाल माती टाकल्यानंतर ती पावसात वाहून जाऊ नये याची खबरदारी घेण्यात आलेली नाही.

वॉकींग ट्रॅकवर लाल मातीचा चिखल झाल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला घसरून पडत असल्याचे प्रकार घडू लागले आहेत. विद्युत व्यवस्थेचेही तसेच आहे. आवश्यक त्या वेळी पथदिवे बंद असतात. मैदानावरील स्वच्छतेकडेही दुर्लक्ष झाल्याने दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतागृहे पाण्याअभावी बंद अवस्थेत आहेत. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था क्रीडा अधिकारी महोदयांनी केलेली नाही.

महिला व पुरूषांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था करण्यात यावी, क्रिकेट खेळण्याकरिता वेळेची मर्यादा घालून देण्यात यावी, अशा विविध मागण्या क्रीडाप्रेमी नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतेवेळी संजीव पाडे, संजय मंत्री, लक्ष्मीकांत जाधव, पवार, अमोल व्हटकर, संजय हंचाटे आदी उपस्थित होते.

Visit : Policenama.com