चीनच्या कुरापतीमुळे लष्कराची हिवाळ्याचा प्लॅन ‘रेडी’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेजवळील स्थिती अजूनही सामान्य झालेली नाही. तिथे तणाव कायम आहे. मुत्सद्दी आणि लष्करी पातळीवरील चर्चेच्या अनेक फेर्‍यानंतरही चिनी सैन्य पूर्णपणे मागे हटले नाही. पुढे कॉर्प्स कमांडरची बैठक होणार की, नाही याबद्दलही अनिश्चितता आहे. चीन बरोबर दीर्घकाळ ही तणावाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने भारतीय लष्कराने आतापासूनच तयारी सुरु केली आहे.

कदाचित हिवाळ्यापर्यंत ही स्थिती अशीच राहू शकते. पूर्व लडाखसारख्या उंचावरील क्षेत्रामध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये पहारा देणे सोपे नाही. कडाक्याच्या थंडीमध्ये ड्युटी बजावताना भारतीय सैन्याला विशेष कपडे, शेल्टर्स, तंबू, इंधन आणि अन्य साहित्याची आवश्यकता भासणार आहे. लडाखमध्ये तैनात असलेल्या जवानांसाठी पुरेसे धान्य आणि अन्य आवश्यक साहित्य पुरवण्याची प्रक्रिया भारतीय सैन्याने सुरु केली आहे.

पँगाँग टीएसो आणि हॉट स्प्रिंग-गोग्रामधून अजूनही चिनी सैन्याने पूर्णपणे माघार घेतलेली नाही. लडाखमध्ये तैनात असणार्‍या सैन्यासाठी वर्षाला एकूण 30 हजार मेट्रीक टन रेशनची गरज लागत असेल, तर आता दुप्पट रेशनची गरज लागणार कारण तिथे अतिरिक्त सैन्य तुकडया तैनात केल्या आहेत असे एका वरिष्ठ सैन्य अधिकार्‍याने सांगितले. चीन लगेच मागे हटणार नाही. त्यामुळे आम्ही पद्धतशीरपणे दीर्घकाळाच्या दृष्टीने तयारी करत आहोत. हिवाळयात लागणार्‍या आवश्यक साहित्याचा स्टॉक करुन ठेवणे सुद्धा सुरु आहे असे या अधिकार्‍याने सांगितले. चीनने कुठलीही आगळीक करु नये, यासाठी हिवाळयातही फॉरवर्ड भागांमध्ये मोठया प्रमाणावर सैन्य ठेवावे लागेल असे या अधिकार्‍याने सांगितले.