‘ड्रॅगन’चा नवा ‘डाव’ ! चीनकडून भारतीय वेबसाईट्स आणि वृत्तपत्रांवर बंदी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारत आणि चीनमध्ये गलवान खोर्‍यातील चकमकीवरुन तणाव असताना भारतीय प्रसारमाध्यमे प्रत्येक घडामोडीची माहिती देत आहेत. चिनी सरकारचे मुखपत्र असणार्‍या वेबसाईट्स व वृत्तपत्रांमधील माहितीही भारतीय प्रसारमाध्यमांकडून दिली जात आहे. यादरम्यान चिनी सरकारने नवी खेळी करत भारतीय प्रसारमाध्यमे आणि वेबसाईट्स ब्लॉक केल्या आहेत.

भारतीय टीव्ही चॅनेल्स सध्या आयपी टीव्हीच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. पण गेल्या दोन दिवसांपासून आयफोन आणि डेस्कटॉपवर एक्स्प्रेस व्हीपीएन काम करत नाही आहे. चिनी नागरिक फक्त व्हीपीएनच्या सहाय्याने भारतीय मीडिया वेबसाईट्स पाहू शकतात. पण चीनकडे तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत फायरवॉल उपलब्ध असून या माध्यमातून व्हीपीएनदेखील ब्लॉक केले जाऊ शकते. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाल्यापासून दोन्ही देशांमध्ये तणाव आहे.

चीनने भारतीय वृत्तपत्र आणि वेबसाईट्स ब्लॉक करण्याचा निर्णय भारताने 59 अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या आधीच घेतला असल्याचे सांगितले जात आहे. चीनने ब्लॉक केलेल्या वेबसाईट्सची संख्या जवळपास 10 हजार झाली आहे. यामध्ये सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप याशिवाय ब्लूमबर्ग, वॉल स्ट्रीट जर्नल, द न्यूयॉर्क टाइम्स यांचाही समावेश आहे.