‘लडाख तर सुरुवात आहे’, तिबेट प्रशासनाने स्ट्रॅटजी सांगत भारताला दिला इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत-चीन यांच्यात तणाव निवळण्यासाठी चर्चा सुरू असली तरी चीनची हेकेखोरी कायम आहे. गलवान खोरे भूभाग असल्याचा दावा चीनने केला असून, भारताने तो फेटाळून लावला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडील स्वत:च्या भूभागापर्यंतच चीनने हालचाली नियंत्रणात ठेवाव्यात, असेही भारताने बजावले. भारत आणि चीनदरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिबेटने भारत सरकारला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

तिबेट प्रशासनाचे अध्यक्ष लोबसांग सांगे यांनी भारत आणि चीनमध्ये सुरु असणार्‍या संघर्षासंदर्भात त्यांनी प्रत्यक्ष ताबारेषेवर चीनकडून सुरु असणार्‍या हलचाली या पूर्वनियोजित असल्याचा दावा केला आहे. चीन करत असलेल्या हालचाली या त्यांच्या ‘फाइव्ह फिंगर्स ऑफ तिबेट स्ट्रॅटजी’ या धोरणाचा भाग असल्याचे सांगे यांनी म्हटले आहे. चीनची स्थापना करणार्‍या माओत्से तुंग यांनीच हे धोरण आखले होते. जेव्हा चीनने तिबेटवर ताबा मिळवण्यासंदर्भात चर्चा केली त्यावेळी माओत्से तुंग आणि अन्य चिनी नेत्यांनी तिबेट हा तळहातासारखा आहे. त्यावर आपण ताबा मिळवणे गरजेचे होते. त्यानंतर आपण पाच बोटांचा विचार केला पाहिजे अशी चर्चाही या नेत्यांमध्ये झाली होती.

या पाचपैकी पहिले बोट हे लडाख आहे. तर इतर चार बोटे म्हणजे नेपाळ, भूतान, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश, असेही स्पष्ट केले. 2017 साली डोकलाममध्ये आणि त्यानंतर आता लडाखमध्ये घडत असणार्‍या घटना या ‘फाइव्ह फिंगर्स ऑफ तिबेट स्ट्रॅटर्जी’चा भाग असल्याचे सांगे यांनी म्हटले आहे. चीनच्या याच धोरणांसंदर्भात तिबेटमधील नेते भारताला मागील सहा दशकांपासून इशारा देत आहेत. केवळ लडाखच नाही तर नेपाळ, भूतान आणि अरुणाचल प्रदेशवरही चीनची नजर असल्याचे सांगे यांनी म्हटले आहे.