पॅन्गाँग सरोवराजवळ संघर्ष : ‘ड्रॅगन’नं सैन्याची कुमक वाढवली, रणगाडे देखील तैनात

बीजिंग : वृत्तसंस्था – चिनी सैनिक २९ ऑगस्टच्या मध्यरात्री सरोवराच्या दक्षिण काठाकडे कूच करत असताना भारतीय सैनिकांनी त्यांचा हा घुसखोरीचा हा प्रयत्न हाणून पडला होता. त्यानंतर आता चीनने या भागात आपल्या सैन्याची कुमक वाढवली असून रणगाडेही तैनात करण्यात आले आहे. त्याशिवाय या भागात नवीन पोस्ट उभारत असल्याचेही उघडकीस आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि चीनचे जवळपास एक लाख सैन्य पूर्व लडाख परिसरात तैनात करण्यात आले आहे. चर्चेतून तणाव कमी होईल अशी भूमिका चीन मांडत असला तरी जमिनीवरील परिस्थिती मात्र वेगळीच आहे. चीन या भागात आपले सैन्य अधिकच बळकट करत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मॉस्कोमध्ये भारत आणि चीनच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये सीमेवरील तणाव कमी करण्याबाबत चर्चा झाली होती.

मॉस्कोतील शांघाय सहकार्य परिषदेदरम्यान शुक्रवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व चीनचे संरक्षणमंत्री वे फेंग यांच्यात भारत आणि चीन सीमेबाबत दोन तासांहून अधिक वेळ बैठक चालली. त्यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आक्रमकता दाखवून जैसे थे परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. चिनी सैनिकांच्या चिथावणीखोर वर्तनामुळे दोन्ही देशांतील द्विपक्षीय करार आणि सीमाप्रश्नी नेमलेल्या विशेष प्रतिनिधींमधील मतैक्याचे उल्लंघन झाले. तर वे फेंग यांनी सीमेवरील तणावास भारतच जबाबदार असल्याचं आरोप करुन एक इंचभर भूमीही गमावरणार नसल्याची, दर्पोक्ती केली.