राम मंदिर भूमिपूजनानिमित्त भाजपा वाटणार 10 लाख लाडू; आमदारांना पोलिसांची नोटीस

पोलिसनामा ऑनलाईन – राम मंदिर भूमिपूजनानिमित्त आमदार महेश लांडगे यांच्यावतीने पिंपरी-चिंचवड शहरात 10 लाख लाडू वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. मात्र, पोलिसांनी यावर आक्षेप घेतला असून आमदार लांडगे यांना नोटीस पाठवली आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये 10 लाख लाडू वाटपाचा कार्यक्रम घोषित केला आहे. पोलिसांनी लांडगे यांना काल सीआरपीसी 149 अंतर्गत ही नोटीस पाठवली आहे. त्यानुसार राम मंदिर भूमिपूजनाच्या अनुषंगाने ठिकठिकाणी लाडू वाटून आनंद साजरा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लाडू वाटप करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे आपण हा लाडू वाटपाचा कार्यक्रम करु नये. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर राहील. अशी नोटीस देण्यात आली आहे.

गर्दी झाल्यास ती करोनाच्या फैलावासाठी कारणीभूत ठरु शकते. त्यामुळेच पोलिसांनी लांडगे यांना लाडू वाटपाचा जाहीर कार्यक्रम न घेण्याबाबत नोटीस पाठवली आहे. पिंपरी-चिंचवडमधील 40 प्रमुख चौकात लाडू वाटप करण्यात येणार असल्याचे भाजपाच्यावतीने सांगण्यात आले होते. इंद्रायणीनगर येथील येथे मोठ्या हॉलमध्ये दोन दिवसांपासून लाडू तयार करण्याची लगबग सुरू आहे. त्यासाठी एका मोठ्या हॉलमध्ये व्यवस्था केली आहे.