आजपासून मध्य रेल्वेवरही लेडीज स्पेशल धावणार !

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनानंतर तब्बल सहा महिन्यांनी पश्चिम रेल्वेवर लेडीज स्पेशल लोकल धावायला लागली आहे. त्यानंतर मध्य रेल्वेला लेडीज स्पेशल सुरू करण्याची जाग आली आहे. त्यामुळेच मध्य रेल्वेवरही आता सकाळी आणि संध्याकाळी दोन लेडीज स्पेशल लोकल चालवल्या जाणार आहेत. यासोबतच ट्रान्स हार्बर मार्गावर देखील चार लोकलच्या फेर्‍या आणि सीएसएमटी ते कल्याण मार्गावर दोन अतिरिक्त लोकलच्या फेर्‍या चालवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वेवर सर्वात जास्त प्रवाशांची संख्या आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी या लोकल चालवण्यात येत आहेत. मात्र त्यातही मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यात महिला डब्यांची संख्या मर्यादित असल्यामुळे महिलांच्या डब्यात होणारी गर्दी कमी करण्यासाठी व महिलांच्या सुरक्षेसाठी लेडीज स्पेशल लोकल चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. महिला विशेष लोकल कल्याण येथून सकाळी 8.25 वाजता सुटणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 9.34 वाजता पोहोचणार आहे . तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून हीच महिला विशेष लोकल 6.35 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 7.44 वाजता पोहोचणार आहे.