‘कोरोना’नंतर 6 महिन्यांनी सुरु होणार ‘लेडीज स्पेशल ट्रेन’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनानंतर पश्चिम रेल्वेने महिलांच्या सोयीसाठी सकाळी आणि संध्याकाळी पिक अवर मध्ये लेडीज स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गर्दीतून जीव मुठीत घेऊन प्रवास करणार्‍या महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच लेडीज स्पेशल लोकल मुंबईमध्ये चालवली जाणार आहे.

पश्चिम रेल्वेने अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांच्या लोकलसेवेमध्ये वाढ करून, 350 ऐवजी 500 फेर्‍या चालवण्याचा निर्णय घेतला होता. आज त्यातही सोमवारपासून सहा फेर्‍यांची वाढ पश्चिम रेल्वेने केली आहे. या सर्व फेर्‍या धीम्या मार्गावरून धावतील. तसेच त्या चर्चगेट ते विरार या स्थानकांच्या दरम्यान चालवण्यात येणार आहेत. याच सहा लोकल पैकी दोन लोकल या लेडीज स्पेशल लोकल असणार आहेत.

कोरोनामुळे 22 मार्च पासून लोकल बंद आहेत. तेव्हापासून लेडीज स्पेशल लोकल चालवण्यात आलेली नाही. त्यानंतर आता सहा महिन्यांनी लोकल सुरु होणार आहे. लोकल सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी विरार वरून चर्चगेटच्या दिशेने जाईल. ती लोकल धीम्या मार्गावरून 9 वाजून 22 मिनिटांनी चर्चगेट स्थानकात पोहोचेल. तर दुसरी लेडीज स्पेशल लोकल ही संध्याकाळी चर्चगेट स्थानकावरून 6 वाजून 10 मिनिटांनी सुटेल. हीदेखील धीमी लोकल असून ती 7 वाजून 55 मिनिटांनी विरार स्थानकात पोहचणार आहे .