बदला घेण्यासाठी मुंबईच्या तरुणीने केले ‘हे’ कृत्य

पणजी : पोलीसनामा ऑनलाईन – वेटरबरोबर झालेल्या वादावरुन चिडलेल्या तरुणीने शेजारच्या हॉटेलात मुक्काम हलविला. त्यानंतर तिने बदला घेण्यासाठी व बदनामी करण्यासाठी त्या हॉटेलमध्ये चक्क बॉम्ब ठेवला असल्याचा कॉल केला. यामुळे पोलिसांची धावपळ उडाली असली तरी आता त्या तरुणीला पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे.

रंगोली परेश पटेल (वय २३, रा. मालाड, मुंबई) असे या तरुणीचे नाव आहे. हा प्रकार कळंगुट परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये मंगळवारी दुपारी घडला एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला आला त्याबरोबर संबंधित हॉटेलात बीडीडीएस पथक, दहशतवादी विरोधी पथक आणि श्वान पथकासह दाखल झाले. पोलिसांनी हॉटेल खाली करण्याची सूचना तेथील व्यवस्थापनाला देण्यात आली. दाखल झालेल्या सर्व पथकांनी हॉटेलची तपासणी सुरु केली. सुमारे दोन तासाच्या तपासणीनंतर हॉटेलात बॉम्ब ठेवल्यासंबंधी करण्यात आलेला फोन बनावट असल्याचे आढळून आले.

हॉटेलची तपासणी सुरु असताना दुसरीकडे बनावट फोन करणाऱ्या त्या युवतीचा शोधही सुरु करण्यात आला. परिसरातील सर्व हॉटेलची तपासणी केली असता त्याच हॉटेलला लागून असलेल्या दुसऱ्या  हॉटेलात ती युवती आपल्या मैत्रिणीसोबत रहात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले चौकशीदरम्यान आपणच फोन केल्याची कबुली त्या युवतीने दिली. त्या हॉटेलातील वेटरसोबत झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी व त्या हॉटेलची बदनामी व्हावी व त्यांची नुकसान व्हावे या हेतूने हे कृत्य केल्याचे तिने सांगितले. तिचे हे कारण समजल्यावर पोलिसांना कपाळावर हात मारुन घेण्याची पाळी आली पोलिसांनी तिला अटक केली आहे.