महिला शिक्षिकेची अपंग विद्यार्थ्याला अमानुष मारहाण, फेकलं पाण्याच्या टाकीत

राजस्थान (बुंदी) : वृत्तसंस्था – विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देण्याचे काम गुरुचे आहे. विद्यार्थ्याकडून चूक झाल्यानंतर त्याला शिक्षा देखील केली पाहिजे पण हिच शिक्षा विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतायला नको. राजस्थानच्या बुंदी येथे एका सात वर्षाच्या अपंग विद्यार्थ्याला केवळ पुस्तकाला कव्हर न घातल्याने महिला वर्गशिक्षिकेने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत तर अपंग विद्यार्थ्याला पाण्याच्या टाकीत फेकून दिले. काही वेळाने त्याच महिला शिक्षिकेने मुलाला टाकीबाहेर काढले. हा प्रकार देवपुरा येथील सेंट्रल अकादमीच्या शाळेत घडला.

हा प्रकार गुरुवारी सायंकाळी मुलाच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले. पोलिसांनी देखील या घटनेचा तपास सुरु केला आहे. पीडित विद्यार्थ्याच्या वडिल सोनू सिंह म्हणाले, जेव्हा आमचा मुलगा दुपारी दोन वाजता घरी आला. तेव्हा त्याचा गणवेश आणि शूज पाण्याने भिजले होते. त्याच्या आईने याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता मुलाने सांगितले की, पुस्तकांना कव्हर न घातल्याने वर्ग शिक्षिकेने मारहाण करून पाण्याच्या टाकीत फेकले.

मुलाने सांगितले की, मॅडमने प्रथम माझा हात धरला आणि काठीने मला मारहाण केली. त्यानंतर त्यांनी मला पाण्याच्या टाकीत टाकले. मुलाच्या वडिलांनी सांगितले की, त्याच महिला शिक्षकेने मुलाला काही वेळाने पाण्याच्या टाकीतून बाहेर काढले. या प्रकरणाची तक्रार सदर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.