परवाना रद्द केल्याने ‘त्याने’ ऑफिसमध्ये घुसून घातल्या महिला इन्सपेक्टरला गोळ्या

मोहाली : वृत्‍तसंस्था – परवाना रद्द केल्याने एका केमिस्टने ड्रग अ‍ॅन्ड फूड कंट्रोलच्या प्रयोगशाळेमध्ये घुसून महिला ड्रग्ज इन्सपेक्टरचा गोळ्या झाडून खून केला आहे. त्यानंतर केमिस्टने तेथून पळ काढला खरा मात्र त्याला परिसरातील नागरिकांनी पकडले. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

नेहा शौरी (36, रा. पंचकुला) असे खून झालेल्या महिला ड्रग्ज इन्सपेक्टरचे नाव आहे तर बलविंदर सिंह असे आरोपीचे नाव आहे.ही घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मोहालीचे एसएसपी हरचरन सिंह भुल्‍लर यांनी सांगितले की, 10 वर्षापुर्वी (सन 2009 मध्ये) रोपड येथे नियुक्‍तीवर असताना नेहा शौरी यांनी आरोपी बलविंदरच्या दुकानावर छापा टाकला होता. बलविंदरच्या दुकानात अंमली पदार्थाचा साठा आढळुन आला होता. त्यामुळे शौरी यांनी त्याच्या दुकानाचा परवाना रद्द केला होता. त्याच रागातुन त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. आरोपी बलविंदर सिंह अचानकपणे मोहालीच्या खरड परिसरातील ड्रग अ‍ॅन्ड फूड कंट्रोलच्या प्रयोगशाळेत घुसला. त्याने कुठलाही विचार न करता नेहा शौरी यांच्यावर गोळया झाडल्या. एक गोळी नेहा यांच्या छातीत तर दुसरी गोळी त्यांच्या डोक्यात लागली. त्यामुळे त्या काही क्षणात रक्‍ताच्या थारोळयात पडल्या. तेथुन काही क्षणात त्याने पळ काढला. मात्र, जमावाने त्याला अडविले. घाबरून त्याने स्वतःवर गोळया झाडल्या. बलविंदरला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याचा मृत्यु झाला.

या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान, प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिले आहेत.