५ हजाराची ‘लाच’ घेताना महिला वैद्यकिय अधिकारी, परिचर ‘अँटी करप्शन’च्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – ५ हजार रुपयांची लाच स्विकारताना कापडणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी व परिचराला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

डॉ. जयश्री ठाणसिंग ठाकूर (वैद्यकिय अधिकारी वर्ग ३, गट-ब, प्राथमिक आरोग्य केंद्र कापडणे ता. जि. धुळे) व दिलीप देवराम निकुंभे (परिचर) अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

तक्रारदार हे कापडणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून अॅम्बूलन्स वाहन चालक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे मंजूर झालेले प्रवासभत्ता आणि ओव्हर टाईमच्या बिलाच्या मोबदल्यात डॉ. जयश्री ठाकूर यांनी ७ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तडजोड करत ५ हजार रुपयांची मागणी केली.

दरम्यान, तक्रारदाराने याप्रकऱणी अँटी करप्शनकडे तक्रार केली होती. अँटी करप्शनच्या पथकाने याची पडताळणी करून सापळा रचला. त्यानंतर डॉ. ठाकूर यांच्या सांगण्यावरून परिचर निकुंभे याने ५ हजार रुपयांची लाच स्विकारताना अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी दोघांवर सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.