कौतुकास्पद ! महिला PSI नं स्वतः दिला खांदा, 2 KM चालत जाऊन स्वतः केले अंत्यसंस्कार (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पोलिस म्हटलं की खाकी वर्दी, काठी आणि कडक रुबाब हेच सध्याचे चित्र लक्षात येते. पण खाकी वर्दीच्या आतला खरा माणूस वेगळाच असतो. हे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कारण एका महिला पोलिस उपनिरीक्षकाने (PSI) जे काही केले ते माणुसकीच्या दृष्टीने एक मोठे उदाहरण दिले आहे.

आंध्र प्रदेश राज्यातील एका गावात बेवारस मृतदेह आढळला होता. पण कोरोनाच्या भीतीमुळे त्या मृतदेहाला कोणीही हात लावण्यास तयार नव्हते. सर्वजण घाबरत होते. पण जेव्हा याबाबतची माहिती महिला पोलिस अधिकाऱ्याला समजली, तेव्हा त्यांनी स्वत: मृतदेह खांद्यावर घेऊन तब्बल दोन किलोमीटरपर्यंत पायी चालत नेला. यावरच त्या थांबल्या नाही तर त्यांनी स्वत:च्या हातानेच त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

श्रीषा असे या संबंधित महिला पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील कासीबुग्गा येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. श्रीषा यांनी त्यांच्या दैनंदिन कर्तव्यापेक्षा विशेष कार्य केल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांकडूनही दखल

श्रीषा यांच्या कर्तव्याची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनीही कौतुक करत ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी लिहिले, की ऑफिशिअल ड्युटीपेक्षा एक पाऊल पुढे टाकून अंत्यसंस्कारासाठी मदत करणे हेच दाखवत आहे. त्यामुळे पोलिसही आपल्या समाजाचे देणं विसरत नाहीत.