शिक्षिकेने ‘त्या’ गटशिक्षणाधिकाऱ्याल्या कार्यालयातच धोपटले

बीड : पोलीसनामा ऑलाइन – महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एका शिक्षिकेने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्या कार्यालयात जाऊन चांगला धडा शिकवला. सुट्टीवर असतानाही ऑफिसला येण्याचा आदेश दिल्याने फोनवर झालेल्या वादातून शिक्षिकेने गटशिक्षणाधिकाऱ्याला त्याच्या कार्यालयात जाऊन धोपटले. हा प्रकार येथील गटसाधन कार्यालयात गुरुवारी दुपारी एक वाजता घडला. गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी या घटनेचा दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे या सहशिक्षिकेकडून बेडसकर मार खात असताना कार्यालयातील अन्य एकही अधिकारी किंवा कर्मचारी त्यांना वाचविण्यासाठी पुढे आला नाही.

लक्ष्मण बेडसकर यांना यापूवीर्ही महिला शिक्षिकेकडुन लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतर त्यांना माजलगाव येथे विस्तार अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला होता. केजचे गटशिक्षणाधिकारी पद रिक्त असल्याने त्यांना प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून केज गटसाधन केंद्रात दोन महिन्यापूर्वी पाठविले होते. येथेही त्यांनी महिला शिक्षिकेचा मार खाल्ला.

केज तालुक्यातील लहुरी केंद्रातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका या ५ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान अर्जित रजेवर होत्या. रजेवर असतानाही केज गटसाधन केंद्राचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी त्यांना मोबाईलवर ८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता संपर्क करुन टपाल घेऊन जाण्यासाठी केजला या, असे फर्मान सोडले. मात्र या शिक्षिकेने मी रजेवर असल्याने येवु शकत नाही, असे सांगितले. यावेळी गटशिक्षणाधिकारी व सहशिक्षका यांच्यात फोनवरून झालेल्या संवादाने संतप्त झालेल्या शिक्षिकेने गुरुवारी दुपारी एक वाजता गटसाधन केंद्रात येवून कार्यालयातच गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांचे गचुरे धरुन मारहाण केली.

बेडसकर यांनी घटना घडल्याचे सांगितले. या शिक्षिकेचे नातेवाईक लहुरी चे केंद्र प्रमुख राख यांच्याकडील अतिरिक्त पदभार काढून घेतल्याने त्या चिडल्या व त्यांनी हा प्रकार केल्याचे बेडसकर यांचे म्हणणे आहे.

या शिक्षिकेने गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी आपणास फोन करून अपशब्द वापरल्याने त्यांची मारहाण केल्याचे सांगितले. या प्रकारानंतर गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर हे उपस्थितांना आपण त्यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केल्याने हा प्रकार घडल्याचे सांगत होते. तसेच या प्रकरणाशी राख यांचा काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले.

ह्याही बातम्या वाचा –

डॉक्टर प्रेयसीचा लग्नास नकार ; टेक्निशियन युवकाची आत्महत्या 

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार 

#WomensDay : महिलादिनानिमित्त गुगलकडून ‘ती’चा खास सन्मान