पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीशी बलात्कार, खून प्रकरणात पोलिस कर्मचार्‍याला जन्मठेप

लखनऊ : वृत्त संस्था – लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने 2011 मध्ये लखीमपुर खीरी जिल्ह्यातील निघासन पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या केल्याच्या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलीस दलातील तत्कालीन पोलीस कॉन्स्टेबल अतीक अहमदला जन्मठेप सुनावली आहे. सीबीआय प्रवक्ते आरके गौर यांनी सांगितले की, न्यायालयाने या प्रकरणात तत्कालीन पोलीस उपाधीक्षक इनायत उल्लाह खान यांनाही पाच वर्षांच्या करावासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीशांनी अहमदला एक लाख रूपये आणि खानला 50,000 रूपयांचा दंडही ठोठावला.

न्यायाधीशांनी म्हटले की, सीबीआयने उत्तर प्रदेश सरकारच्या निर्देशानंतर 20 डिसेंबर, 2011 ला प्रकरण दाखल केले होते आणि निघासन पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येसंदर्भात अगोदरच दाखल केलेल्या एफआयआरच्या प्रकरणाचा तपास आपल्याकडे घेतला होता. प्रवक्त्यानुसार या प्रकरणात चार आरोपींच्या विरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. परंतु, न्यायालयाने दोघांची मुक्तता केली.

म्हशी चरण्यासाठी शेतात घेऊन गेली होती

14 वर्षांच्या मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की, त्यांची मुलगी म्हशीला चरण्यासाठी शेतात घेऊन गेली होती, यावेळी म्हैस पोलीस ठाण्याच्या परिसरात शिरली. खुप वेळ झाला तरी मुलगी घरी न परतल्याने तिची आई पोलीस ठाण्यात गेली. तेव्हा तिला तिच्या मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या आवस्थेत दिसला. आईने मुलीच्या शरीरावरील जखमा पाहिल्या असता, असे दिसत होते की, कुणीतरी तिच्यावर बलात्कार केला आहे. या हत्येला आत्महत्या दर्शवण्यासाठी फासावर लटकवण्यात आले होते.