‘गरिबी मुक्त’ भारताचा नारा देणारे लाल बहाद्दूर शास्त्री ५५ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी बनले होते ‘पंतप्रधान’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आजचा दिवस भारतीय इतिहासात खास आहे. कारण ५५ वर्षांपूर्वी याच दिवशी अतिशय साधे सरळ आणि संघर्षातून पुढे आलेले व्यक्तिमत्व पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे २७ मे १९६४ मध्ये निधन झाले होते. त्यांनतर गुलझारी लाल नंदा यांना हंगामी पंतप्रधान म्हणून नियुक्त केले होते. गुलझारी लाल नंदा केवळ १३ दिवस हंगामी पंतप्रधान म्हणून राहिले त्यानंतर लाल बहादुर शास्त्री यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. लाल बहादुर शास्त्री यांनी ९ जून १९६४ मध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेतली.

केवळ ५८१ दिवसांची कारकीर्द –

लाल बहादूर शास्त्री यांना केवळ ५८१ दिवसांचा कार्यकाळ लाभला. नेहरूंच्या मृत्यूनंतर पंतप्रधान पदासाठी अनेक नवे चर्चेत होती. खुद्द शास्त्री यांनीच पंतप्रधान पदासाठी इंदिरा गांधी यांचे नाव सुचवले होते. पडद्यामागे चाललेल्या मोठ्या चर्चा व वादविवादानंतर तत्कालीन कांग्रेस अध्यक्षांनी लाल बहादुर शास्त्री यांना पंतप्रधान म्हणून घोषित केले. पंतप्रधान बनल्यानंतर शास्त्री यांनी प्रथमच ११ जून १९६४ रोजी देशवासियांना संबोधित केले. ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ अशी ख्याती असणाऱ्या पंतप्रधानांविषयी जाणून घेऊया काही खास गोष्टी –

लहानपण –

लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून सात मैल दूर मुघलसराई या लहान गावात झाला. लाल बहादूर शास्त्री केवळ दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांची परिस्थिती बेताची बनली व त्यांची आई तीन मुलांसह वडिलांच्या घरी राहण्यास आली. घरी सर्वजण त्यांना ‘नन्हे’ नावाने हाक मारीत. उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे, यासाठी त्यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेला जायचे. कडक उन्हाळयातही तापलेल्या रस्त्यावरुन ते शाळेत जायचे.

७ वर्ष तुरुंगवास –

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लाल बहादुर शास्त्री यांचे योगदान महत्वाचे होते. भारतात ब्रिटीश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजांची महात्मा गांधी यांनी केलेल्या निंदेमुळे ते अत्यंत प्रभावित झाले. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री केवळ अकरा वर्षांचे होते. तेव्हापासूनच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सामील होण्याचा निर्धार केला. गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले, त्यावेळी लाल बहादूर शास्त्री सोळा वर्षांचे होते. असहकार चळवळीत सहभागी झाल्याबद्दल त्यांना पहिल्यांदा तुरुंगात जावे लागले मात्र अल्पवयीन असल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर १९३० साली त्यांना अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली. ते १९४० मध्ये आणि १९४१ ते १९४६ दरम्यान पुन्हा तुरुंगात राहिले. त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले आणि एकूण सात वर्षे ब्रिटीश तुरुंगवासात घालवली.

शास्त्री नाव कसे पडले-

ब्रिटीश राजवटीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या अनेक राष्ट्रीय संस्थांपैकी एक वाराणसीतील काशी विद्यापीठात ते सामील झाले. येथे अनेक महान विद्वान आणि देशभक्तीचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडला. विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव ‘शास्त्री’ होते. त्यामुळे त्यांच्या नावापुढे शास्त्री हे नाव कायमचे जोडले गेले.

हुंडा म्हणून एक चरखा-

१९२७ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांची पत्नी ललिता देवी हया त्यांच्याच शहराजवळील मिर्झापूर येथील होत्या. त्यांचा विवाह पारंपारिक पध्दतीने पार पडला. त्यांनी हुंडा घेण्यास नकार दिला होता. मात्र सासऱ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी हुंडा म्हणून एक चरखा आणि हाताने विणलेले काही मीटर कापड घेतले.

महिला कंडक्टर भरती –

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस जेव्हा सत्तेवर आली. त्यांना त्यांच्या उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव नियुक्त करण्यात आले आणि लवकरच ते गृहमंत्री पदावर आरुढ झाले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत महत्वाचे निर्णय घेतले त्यापैकी म्हणजे एक महिला कंडक्टर भरती.

दुर्घटनेनंतर राजीनामा देणारे पहिले रेल्वे मंत्री-

रेल्वे अपघातानंतर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणारे लाल बहादुर शास्त्री हे पहिलेच मंत्री ठरले. जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात त्यांना १३ मे १९५२ रोजी रेल्वे मंत्री बनवण्यात आले होते. २७ नोव्हेंबर १९५६ रोजी तामिळनाडुतील अरियालुर येथे एक भयानक रेल्वे अपघात झाला, ज्यामध्ये सुमारे १४२ लोक मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला. देश आणि संसदेने त्यांच्या अभूतपूर्ण निर्णयाची प्रशंसा केली.

जय जवान, जय किसान घोषणा –

१९६४ मध्ये जेव्हा लाल बहादुर शास्त्री पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी अन्नधान्याशी संबंधित अनेक गोष्टी आयात केल्या. १९६५ मध्ये पाकिस्तानबरोबरच्या युद्धादरम्यान देशामध्ये तीव्र दुष्काळ पडला होता. संकट टाळण्यासाठी त्यांनी देशवासीयांना एक दिवस उपवास करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर कृषी उत्पादनात आत्मनिर्भरतेसाठी त्यांनी ‘जय जवान जय किसान’ ची घोषणा दिली.

संशयास्पद परिस्थितीत मृत्यू –

लाल बहादूर शास्त्री यांचा ताश्कंद येथे अचानक मृत्यू झाला होता आणि या मृत्यूचे गूढ आजही कायम आहे. या घटनेला ५३ वर्षे उलटली आहेत. त्यांच्या कार्यकाळात १९६५ साली पाकिस्तानने भारतावर युद्ध लादले. ते युद्ध भारतानें जिंकले. त्यानंतर शास्त्री युद्ध करारासाठी रशियातील ताश्कंदमध्ये गेले.
रशियाच्या दबावानंतर शास्त्रीजींनी पाकिस्तानचा जिंकलेला प्रदेश परत द्यायच्या करारावर सह्या केल्या. ताश्कंद करार या नावाने तो करार जाहीर झाला. ताश्कंद मध्ये पाकिस्तानचे राष्ट्रपती आयुब खान यांच्या सोबत युद्ध समाप्त करार केल्यानंतर केवळ १२ तासांत ११ जानेवारी १९६६ रोजी लालबहादूर शास्त्री यांचा गूढ मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूचे रहस्य आजही कायम आहे. हा मृत्यू नसून हत्या असल्याचा आरोप शास्त्रींच्या कुटुंबीयांनी केला होता. शास्त्रींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची मागणी शास्त्रींच्या कुंटुंबीयांनी तत्कालीन हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांच्याकडे केली होती. ही मागणी त्यांनी फेटाळल्यानंतर शास्त्रींच्या मृत्यूचे गूढ आणखीन च वाढले. ५३ वर्षानंतरही हे गूढ अजून कायम आहे.