लालबाग सिलिंडर स्फोट : रविवारी हळद अन् बुधवारी लग्न, त्यापूर्वीच नियतीचा कुटुंबावर घाला, एकाचा मृत्यू तर 15 जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लालबाग सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या मंगेश राणे यांची मुलगी पूजा राणे हिची रविवारी हळद होती, तर बुधवारी लग्न होते, मात्र, रविवारी (दि. 6) सकाळी साडेसातच्या दरम्यान राणे कुटुंबीयांच्या घरात झालेल्या सिलिंडर स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले. यात वधूपिता मंगेश राणे देखील जखमी झाले. तेव्हा पूजा लगतच्या घरात होती. त्यामुळे सुदैवाने तिला काहीही झालेले नाही लालबाग येथील गणेश गल्लीमधील तळमजला अधिक चार मजली साराभाई इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर खोली क्रमांक 17 मध्ये रविवारी सकाळी ही घटना घडली.

हळदीनिमित्त राणे कुटुंबियांच्या घरात पाहुणे, नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी अचानक स्फोट झाल्याने एकाचा मृत्यू तर 15 जण जखमी झाले. जखमीना उपचारासाठी तातडीने केईएम रुग्णालयात दाखल केले. दरम्यान महापौर किशोरी पेडणेकर यांनी केईएम रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांच्यावर तातडीने सर्वतोपरी उपचार करण्याचे निर्देश दिले. केईएम रुग्णालयातील जखमींची विचारपूस केल्यानंतर त्यांनी घटनास्थळाला भेट दिली.

…अन् अचानक झाला स्फाेट
ज्यांच्या घरी गॅस दुर्घटना झाली, त्यांच्याकडे लग्नविधी सुरू होते. अचानक गॅस लिकेज होत असल्याचे लक्षात आल्यानंतर घरातील सर्वजण नेमके काय होत आहे. हे पाहण्यासाठी गेले, त्यावेळी अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. दुर्घटनाग्रस्त कुटुंबाची राहण्याची व्यवस्था लगतच्या हॉटेलात केली असून घराची दुरुस्ती करण्याचे आदेश म्हाडाच्या अधिका-यांना दिले आहेत.