यावर्षी गणेशोत्सव नव्हे तर आरोग्योत्सव, लालबागचा राजाचा ऐतिहासिक निर्णय

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवासंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव साजरा न करता आरोग्यत्सव साजरा करण्यावर मंडळाच्या बैठकीत एकमत झाले आहे. यंदा राजाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार नाही, असे लालबागचा राजा मंडळाचे सुधीर साळवी यांनी सांगितले आहे. श्री गणेश मूर्तीची स्थापनाच होणार नसल्यामुळे यंदा लालबागचा राजाच्या दर्शनाला भाविकांना मुकावे लागणार आहे.

गणपती बाप्पाची मूर्ती न बसवता या 11 दिवसांमध्ये रक्तदान शिबिरे तसेच प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. सध्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर असतानाच राज्यासमोर असणारे करोनाचे संकट लक्षात घेता मंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनला येतात. करोनाच्या काळात ही गर्दी टाळण्यासाठी मंडळाने यंदा मूर्ती न बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील आरोग्य यंत्रणेवर आधीच बराच ताण आहे. त्यात गणेशोत्सवामुळे होणार्‍या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग होऊ नये या दृष्टीने खबरदारी म्हणून मंडळानेच पुढाकार घेत हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नवसाला पावणारा म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध असणार्‍या लालबागच्या राजाला 86 वर्षांची पंरपरा आहे. मागील 86 वर्षांपासून लालबागमधील मार्केटमध्ये राजाची मूर्ती विराजमान होते. अनेक वर्षांपासून राजाची 14 फुट उंचीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आवर्जून येतात. मात्र यंदा कोरोनामुळे उत्सवाऐवजी रक्तदान आणि प्लाझमा थेरपी शिबिरे राबवण्यात येणार आहेत.