लालुप्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर; एअर अ‍ॅम्बुलन्सने दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलविले

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव (lalu yadav ) यांची प्रकृती गेले काही दिवसांपासून गंभीर असून शनिवारी रात्री उशिरा त्यांना एअर अ‍ॅम्बुलन्सद्वारे दिल्लीला हलविण्यात आले. दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सध्या उपचार करण्यात येत आहे. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी यादवही दिल्लीला आले आहेत. लालुप्रसाद यादव (lalu yadav ) यांना चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा झाली होती. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रांचीमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

फुफ्फुस आणि किडनीच्या त्रासामुळे गेले अनेक दिवस ते आजारी आहेत. गुरुवारी रात्रीपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. रांचीमधील रिम्समध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. त्यांची तब्येत आणखी खराब झाल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांना एम्समध्ये हलविण्यास सांगितले. दरम्यान, कोर्टाने त्यांच्यासमवेत राबडीदेवी आणि मुलगा तेजस्वी यादव यांना जाण्याची परवानगी दिली. सध्या लालुप्रसाद यादव यांच्यावर एम्समध्ये उपचार करण्यात येत आहे. त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे तेजस्वी यादव यांनी सांगितले.