भूसंदापनाच्या मोबदल्याची रक्कम तातडीने अदा करण्याचे आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – बाह्यवळण रस्ता म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 मध्ये अनेक शेतकर्‍यांच्या जमीनी जात आहे. या जमीनी शासनाने संपादित करण्यास सुरुवात केली असून, स्थानिक शेतकर्‍यांनी जागेला योग्य भाव मिळाला नसल्याचे व विश्‍वासात न घेता एकतर्फा निवडा दिल्याचा आरोप करीत भूसंपादनास विरोध दर्शविला होता. या पार्श्‍वभूमीवर खासदार डॉ.सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि.4 जानेवारी) केडगाव येथील निशा लॉन्समध्ये बाह्यवळण रस्ता भूसंपादन तक्रार निवारण बैठक पार पडली.

यावेळी उपविभागीय अधिकारी अर्जुन श्रीनिवास, भूसंपादन अधिकारी अजय मोरे, शाहू मोरे आदींसह तहसिलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी तसेच निंबळक, नेप्ती, केडगाव व अरणगाव येथील बाधीत शेतकरी व गावाचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. निंबळक, नेप्ती, केडगाव व अरणगाव येथील बाधीत शेतकरी व गावाचे लोकप्रतिनिधी यांनी या बैठकित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 भूसंपादन करताना झालेल्या चुका व त्रुटी निदर्शनास आणून दिल्या.

खासदार विखे यांनी बाधित शेतकर्‍यांच्या जागा संपादित करताना झालेल्या चूका दुरुस्त करण्याचे व योग्य मोबदला मिळण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना केल्या. तर बाधीत शेतकर्‍यांना भूसंदापनाच्या मोबदल्यात मिळणारी रक्कम तातडीने अदा करण्याचे आदेश दिले.

बाह्यवळण रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी शासनाने जागेला अत्यल्प भाव दिला आहे. हरकत नोंदवून देखील अंतिम निवाडा देण्यात आल्याचा शेतकर्‍यांचा आरोप आहे. या बैठकित निंबळकचे माजी सरपंच विलास लामखडे, आबुज मेजर, उपसरपंच अशोक पवार, जगन्नाथ शिंदे, शंकर साठे, अरणगावचे चेअरमन माऊली, केडगावचे प्रभाकर गुंड, पंडित सातपुते, सुनील कोतकर, पोपट कराळे, जालिंदर कोतकर, मोहन पठारे यांनी बाधित शेतकर्‍यांची बाजू मांडली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/