राममंदिर भूमिपूजनानंतर अयोध्येत जमिनीचे भाव गगनाला भिडले

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राममंदिराचे भूमिपूजन झाल्यानतंर अयोध्येत जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. व्यवसाय करण्यासाठी अनेकांनी तेथे जमीन घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिल्यानंतर जमिनीचे भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. आता भूमिपूजन झाल्यानंतर जमिनीचे भाव दुपटीहून अधिक झाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जमिनीचे भाव 30 ते 40 टक्के वाढले होते. भूमिपूजनानंतर ते दुपटीहून अधिक झाले आहेत. 5 ऑगस्टला अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचे भूमिपूजन केले होते. अयोध्येच्या आजूबाजूला जमिनीचा दर गेल्या वर्षी 400-500 रुपये प्रतिचौरस फूट होता, तो आता 1000 ते 1500 रुपये प्रतिचौरस फूट झाला आहे. मध्यवर्ती भागात जागेचे दर 2 ते 3 हजार रुपये चौरस फूट आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाअगोदर जमिनीचा शहरातील भाव 1 हजार रुपये चौरस फूट होता. अवध विद्यापीठाचे विनोद कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले, जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. उद्योगपती व सामान्य लोकही जमिनी घेत आहेत. असे असले तरी खरेदीला अजून पूर्ण वेग आलेला नाही, कारण सरकारने पायाभूत प्रकल्प हाती घेतलेले नाहीत.