जिवंत पत्नीला मृत दाखवून हडपली जमीन

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – जिवंत असलेल्या पत्नीला मृत दाखवून जमीन हडपल्याचा प्रकार पाथरी येथे उघडकिस आला आहे. याप्रकऱणी पाथरी पोलिसात पती, मुलगी, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती किशनराव धोंडीबा तायनाक, वृंदावनी सुभा मगर, भागवंत मुंजाजी फड, धोंडीराम माणिक जाधव, मच्छिंद्रनाथ जालिंदर बाणे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रुख्मीणीबाई तायनाक यांनी फिर्याद दिली आहे.

रुख्मीणी बाई यांना १९८० मध्ये घरातून काढून दिले होते. त्यांना कोणत्याही प्रकारचा आधार नाही. त्या निराधार असल्याचा गैरफायदा घेत पती, तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक यांनी संगनमत केले. त्यानंतर संबधित महिला जिवंत असताना मृत असल्याची कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे तिला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्या नावावर असलेली किन्होळा खुर्द येथील जमीन खरेदीखताच्या आधारे हडप केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकऱणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आवेज मकसुद काजी करत आहेत.