धक्कादायक ! भाडेकरूनं लावला 100 वॅटचा ‘बल्ब’, घरमालकानं केला खून

पोलिसनामा ऑनलाईन – घरात 100 वॅटचा बल्ब लावल्याच्या कारणावरून घरमालकाने भाडेकरूला मारहाण केली. मारहाणीत भाडेकरू सोफ्याला असलेल्या लाकडावर पडल्यामुळे बेशुद्ध झाला. कुटुंबीयांना त्याला त्वरित रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. उत्तर पूर्व दिल्लीतील हर्ष विहार परिसरात खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. जगदीश असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

दोन वर्षांपासून जगदीश आणि त्याचे कुटुंबीय त्या घरात राहत होते. गुरूवारी संध्याकाळी त्याची पत्नी 100 वॅटचा बल्ब लावून जेवण तयार करत होती. त्याचवेळी घरमालक मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या घरात पोहोचला. यावेळी त्याने 100 वॅटच्या बल्बमुळे अधिक वीज खर्च खत होत असल्याचे म्हणत आरडाओरड सुरू केली. त्यानंतर त्याने बल्ब काढून घरातून कमी वॅटचा बल्ब आणून दिला. ओरडण्याचा आवाज ऐकून जगदीश त्या ठिकाणी पोहोचला आणि त्याने पत्नीला याबाबत विचारणा केली. त्यावेळी घरमालकही त्या ठिकाणी पोहोचला आणि त्याने जगदीशवर हात उगारला. त्याच क्षणी जगदीश सोफ्याला असलेल्या एका लाकडावर आदळून बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु शुक्रवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जगदीश रिक्षा चालक होता. पत्नी आणि 8 वर्षीय मुलीसह हर्ष विहार परिसरात राहत होता.