केरळमधील मोठी दुर्घटना ! भूस्खलनात 80 हून अधिक मजूर दबले

तिरुअनंतपुरम : वृत्तसंस्था – मुसळधार पावसानं इडुकी जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. एका क्षणात डोळ्या देखत अख्खी वस्ती जमीनदोस्त झाली. जवळपास 80 हून अधिक मजूर याठिकाणी रहात होते. याच ठिकाणी भूस्खलनाची दुर्घटना घडली आहे. यामध्ये 80 हून अधिक मजूर दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान आतापर्यंत या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

ज्या ठिकाणी हे भायानक भूस्खलन झाले त्या ठिकाणी चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांची वसाहत होती. त्यांनी तेथे आपल्या राहण्याची व्यवस्था केली होती. या ठिकाणी बागांमध्ये काम करणारे मजूर मोठ्या संख्येने रहात होते. जेव्हा हे भूस्खलन झाले तेव्हा डोंगरावरील मातीचा ढिगारा थेट मजूरांच्या घारावर कोसळला. या मातीच्या ढिगाऱ्याखाली सर्व मजूर दबले गेले. येथे बहुतेक मजूर हे तामिळनाडूचे रहिवासी होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन व्यवस्थापन आणि NDRF, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळावरून आतापर्यंत 10 जणांना रेस्क्यू करण्यात आल्याची माहिती आहे. या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन वेगात सुरु आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. तर मुसळधार पावसामुळे केरळमध्ये घडलेल्या या मोठ्या दुर्घटनेत रेस्क्यू ऑपरेशन करण्यात अडथळे येत आहेत.