home page top 1

खंडाळ्याजवळ रेल्वेमार्गावर पुन्हा दरड कोसळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

शनिवारी रात्री पुन्हा एकदा पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर खंडाळ्याजवळ मोठ्याप्रमाणावर दरड कोसळली. ही दरड अप आणि मिडल लाईनवर कोसळल्याने लोणावळ्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तर अनेक गाड्या अचानक रद्द करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी ही दरड कोसळली. यामुळे कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस खंडाळा स्थानकात थांबवण्यात आली होती.

दरड कोसळल्याने उशीरपर्यंत कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस रखडली होती. रात्री १ वाजता या मार्गावरुन चेन्नई एक्स्प्रेस रवाना होणार होती. ही गाडीदेखील रखडली. मात्र, हा मार्ग पूर्णपणे ठप्प झाल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत.

[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7d659722-a8ef-11e8-acd2-a757e02e8c53′]

दरड कोसळल्यामुळे लोणावळा-कर्जत लोकल रद्द करण्यात आली आहे. लोणावळ्यापासून पुढे वाहतूक बंद असल्याने पुण्याहून लोणावळ्यापर्यंत गाड्या सुरू ठेवण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. मात्र पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचा मोठ्याप्रमाणात खोळंबा झाला. अनेक प्रवाशी विविध स्थानकांमध्ये गाड्यांची वाट पाहात होत.

पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर दरड कोसळण्याची ही दोन दिवसांतील दुसरी घटना आहे. शुक्रवारी लोणावळा-कर्जत दरम्यान असलेल्या खंडाळा घाटातील मंकीहिल जवळ दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने मिडल लाइन बंद ठेवण्यात आली होती. मात्र, या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला नव्हता. बोरघाटाचा परिसर असलेल्या मंकीहिलजवळ डोंगरावरुन काही दगड मिडल लाइनवर पडल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांनी पाहिले व तातडीने समोरुन येणाऱ्या रेल्वे बँकरला लाल बावटा दाखवत बँकर थांबविल्याने मोठी दुर्घटना टळली होती. रेल्वे युद्धपातळीवर रुळांवरील दरड बाजूला करत दुपारी एक वाजता मार्ग मोकळा केला होता. मात्र, शनिवारी रात्री कोसळलेली दरड ही अप आणि मिडल लाईनवर कोसळल्याने मोठ्याप्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोणावळा-मुंबई हा मार्ग ठप्प झाला असून अनेक गाड्या अडकून पडल्या होत्या.

Loading...
You might also like