Lockdown मध्ये पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्रसाठा जप्त, आंतरराज्यीय टोळीतील 15 जणांना अटक तर 42 पिस्तुले जप्त

पिंपरी/पुणे : पोलीनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील पिस्टलची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी 15 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 42 पिस्टल व 66 जिवंत काडतुसे असा एकूण 19 लाख 89 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक लक्ष्मण आढारी यांना मिळालेल्या माहितीनुसार गणेश माळी (रा. सांगवी) याला पिस्टलसह अटक करण्यात आली होती. त्याने हे पिस्टल ग्यानोबा उर्फ गोटू मारुती गिते (रा. परळी जि. बीड) याच्याकडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर दोघांकडून 6 पिस्टल आणि 15 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी ही पिस्टल मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील सरदार नावाच्या व्यक्तीकडून घेतली होती. पोलीस त्याच्या शोधात गेले होते मात्र लॉकडाऊनमुळे तपास करता आला नाही.

दरम्यान, एक पथक मध्य प्रदेशात पाठवण्यात आले. या पथकाने वेशांतर करून आरोपीचा शोध घेतला. आरोपी मानसिंग गुरमुख सिंग भाटीया याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 11 गावठी पिस्टल व 22 जिवंत काडतुसे जप्त केली. भाटी याला मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील ग्राम सिंघाना येथून अटक केली. आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्याचा साथिदार कुलसिंग जसवंत (रा. ग्राम सिंघाना, थाना मनावर, जि. धार) याने महाराष्ट्रातील कुश नंदकुमार पवार (रा. तळेगाव दाभाडे) व प्रसन्न ज्ञानेश्वर पवार (रा. गोडुंब्रे, शिरगाव), आकाश उर्फ बाळा जगन्नाथ वाघमोडे (रा. कुर्डुवाडी जि. सोलापूर) व योगेश विठ्ठल कांबळे (रा. परांडा जि. उस्मानाबाद), गोटु उर्फ ग्यानबा मारुती गिते (रा. परळी जि. बीड) या टोळीला पिस्टल विकल्याचे निष्पन्न झाले. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. कुश पवार आणि प्रसन्न पवार या टोळीने मध्य प्रदेशातून 29 पिस्टल आणून विकल्याचे तपासात समोर आले. विक्री करण्यात आलेले पिस्टल मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या 9 आरोपींना विकल्याचे समोर आले. पोलिसांनी या कारवाईत 26 पैकी 15 आरोपींना अटक केली आहे.

ही करावई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामथान पोकळे, पोलीस उपायुक्त गन्हे सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस हवालदार प्रविण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, आदिनाथ मिसाळ, पोलीस नाईक संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो.गौस नदाफ, वासुदेव मुंडे, पोलीस शिपाई शावरसिद्ध पांढरे, प्रशांत सैद, सुनिल गुट्टे, तुशार काळे, सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, नागेश माळी, राजेंद्र शेटे यांच्या पथकाने केली.