‘मदतीला विलंब झाल्यामुळेच विदर्भातील शेती आणि घरांचं मोठं नुकसान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हात पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पुरस्थितीत मदतीला विलंब लागल्यानेच घरे आणि शेतीचे नुकसान झाल्याचं म्हणत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. कोरोनाच्या काळात राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा जनतेला दिसत आहे. तो लपवण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचे काम सुरु आहे, असा आरोप करत फडणवीसांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. कोल्हापूरची कोरोना स्थिती गंभीर असल्याचे सांगत कोरोनावरुन राज्य सरकारच्या कारभावर फडणवीस सातत्याने लक्ष ठेवत उणीव आणि चुका दाखवून देत आहेत. अशातच पूरस्थितीमुळे विदर्भातील ५ जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे.

फडणवीस म्हणाले, पुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली, जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. मध्यप्रदेश सरकारसोबत राज्य शासनाने योग्य समन्वय साधला नाही. राजीव सागर धरणातून पाणी सोडल्यानंतर ते पाणी ३६ तासात पूर्व विदर्भात पोहचते. मात्र, ३६ तास हाती असतानाही विलंब केल्याने हे पाणी गावात शिरले. वेळीच इशारा दिला असता, तर हे संकट टाळता आला असते, असे त्यांनी म्हटलं. भंडारा जिल्ह्यात या पुरस्थितीचा मोठा फटका बसला असून तब्बल ५ हजार कुटूंब बाधित झाले आहेत. नदीकिनारच्या शेतीचेही मोठे नुकसान झालंय. चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातही तीच परिस्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले. तथापि, कर्नाटकमधील अलमट्टीप्रश्नी आता महाराष्ट्राने खंबीर भूमिका घ्यावी. आम्ही त्यांच्यासमवेत आहोत, उंची वाढल्याने काय परिणाम होतील हे आपल्याला गेल्यावर्षीच कळून चुकले आहे, असे त्यांनी याआधी म्हणाले होते.

भंडारा जिल्हात पूरस्थिती गंभीर
भंडारा तालुक्यात २३ गावातील १७९० कुटूंब, पवनी तालुक्यात २२ गावातील ५०५, तुमसर तालुक्यातील ५ गावातील १२७, मोहाडी तालुक्यातील ६ गावातील १६७ व लाखांदूर तालुक्यातील २ गावातील ५७ कुटूंब असे एकूण ५८ गावातील २६४६ कुटूंब बाधित झाले आहे. बाधित कुटूंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असून जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन युद्धस्तरावर मदत व बचाव कार्य करत आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केलं.

लढाई मोदींशी नाही, कोरोनाशी आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिगरभाजप बैठकीवेळी मोदी यांचे नाव न घेता, लढायचं की नाही हे एकदा ठरवा, असे वक्तव्य केलं होत. यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या हे कोणीतरी लक्षात आणून दिलं पाहिजे की, आपली लढाई कोरोनासोबत सुरु आहे. ती लढली पाहिजे. लढाई मोदी यांच्याशी नाही.