धक्कादायक ! ‘कोरोना’ पॉझिटीव्ह रुग्णांच्या जेवणात आढळल्या अळ्या, ‘या’ रुग्णालयातील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – एकीकडे कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहे अशातच आता जेवणात अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयातील हा प्रकार आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळं असे प्रकार घडत आहेत असा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे.

पिंपर चिंचवड शहरात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना जेवण देण्यासाठी महापालिकेनं खासगी संस्थांना कंत्राट दिलं आहे. मात्र या संस्था निकृष्ट दर्जाचे जेवण देत असल्याचे आरोप केले जात आहेत. अनेकदा समोर आलेलं जेवण बेचव असल्यानं ते टाकून दिल्याचे प्रकारही जिजामाता रुग्णालयात सातत्यानं घडत आहेत. तिथल्या अनेक रुग्णांनी याबाबत तक्रार केली आहे. काही समाजिक कार्यकर्ते व माकपतर्फे देखील महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन देण्यात आलं. परंतु यानंतरही जेवणाचा दर्जा सुधारला नसल्याचे आरोप होताना दिसत आहेत.

नेमकं काय घडलं ?

जिजामाता रुग्णालयातील कोरोना रुग्णांना शनिवारी (दि 15 ऑगस्ट) रोजी जेवण देण्यात आलं. यावेळी त्यांच्या ताटात अळ्या आढळून आल्या. यानंतर रुग्णांनी यासंदर्भात तक्रार केली. मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानं रुग्णांनी याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळं हा प्रकार समोर आला.

जेवणाचं कंत्राट घेणाऱ्या ठेकेदाराविरोधात आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत माकपच्या शहर समितीचे सचिव गणेश दराडे म्हणाले, “महापालिकेनं जेवणाचं कंत्राट दिलेले ठेकेदार याला जबाबदार आहेत. संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर या प्रकरणी कारवाई करावी” अशी मागणी त्यांनी केली.

महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “जिजामाता रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या जेवणात अळ्या आढळल्या किंवा कशा आढळल्या यासंदर्भात चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चौकशी पूर्ण झाल्यांतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.”