‘डेक्कन क्वीन’मधील खाद्यपदार्थात आढळल्या आळ्या आणि किडे !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रेल्वेमध्ये मिळणाऱ्या खाद्य पदर्थाबाबत प्रवाशांची नेहमीच ओरड असते. रेल्वेत मिळणारे खाद्य पदार्थ निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी प्रवासी करत असतात. अशातच मुबई-पुणे डेक्कन क्वीन मधील पॅन्टीमधून मागवलेल्या अंड्याच्या ऑम्लेटमध्ये आळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका प्रवाशाने मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या उपप्रबंधक कार्यालयात आज (बुधवार) लेखी तक्रार केली आहे.

डेक्कन क्वीन रेल्वेने हजारो प्रवाशी तसेच चाकरनामे रोज प्रवास करत असतात. प्रवासादरम्यान प्रवासी रेल्वेमधील पॅन्ट्रीमधून खाद्यपदार्थांची ऑर्डर देतात. मात्र, प्रवाशांना मिळणारे खाद्य पदार्थ निकृष्ट दर्जाचे देण्यात येत असल्याचा प्रत्यय डेक्कन क्वीनमध्ये सागर काळे या प्रवाशाला आला. सागर काळे हे मुंबईहून पुण्याला येत असताना त्यांनी ऑम्लेटची ऑर्डर दिली होती.

सागर काळे यांना देण्यात आलेल्या अंडा ऑम्लेटमध्ये आळ्या सापडल्या तर त्याच्यासोबत देण्यात आलेल्या चाट मसाळ्यातून किडे बाहेर पडताना दिसून आले. काळे यांनी याचा व्हिडीओ काढला असून हा व्हिडीओ रेल्वे प्रशासनाकडे दिला आहे. तसेच त्यांनी लेखी तक्रार करून संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी यासंबंधी केंद्रीय रेल्वे खात्याला तक्रार केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त