दिलासादायक ! लासलगाव येथील 5 बाधित झाले ‘कोरोना’मुक्त

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाईन – लासलगाव येथील कोव्हीड -19 कोरोना केअर केंद्रात सहा रूग्ण उपचार घेत होते त्यातील लासलगाव परीसरातील पाच रूग्ण यशस्वी उपचाराने कोरोना मुक्त झाले असुन काल सकाळी ११ वाजता या सर्व रुग्णांवर फुलांचा वर्षाव करून निरोप देऊन रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आले असल्याची माहिती लासलगाव कोव्हीड 19 केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राजाराम शेंद्रे यांनी दिली.

लासलगाव येथील खाजगी डॉक्टर च्या संपर्कात आलेल्या लासलगाव,निमगाव वाकडा,वेळापुरे, पाचोरे, मरळगोई येथील ५ रुग्णांवर लासलगाव येथील कोव्हीड -19 कोरोना केअर केंद्रात उपचार सुरू होते तसेच या सर्व रुग्णांच्या संपर्कात असलेले ५१ रुग्णांना कोरोन्टाईन करण्यात आले होते त्यांचे अहवाल सुद्धा निगेटिव्ह आल्याने त्यांनाही घरी सोडण्यात आले.लासलगाव येथे असलेल्या कोव्हीड -19 कोरोना केअर केंद्रात या सर्व रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले त्या बद्दल या सर्व रुग्णांनी व समस्त लासलगाव करांनी वैद्यकीय अधिकारी,परिचारिका तसेच आरोग्य सेवकांचे आभार मानले.लासलगाव व परिसरात आता एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याने लासलगावकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ चेतन काळे यांनी कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांशी संवाद साधला व या सर्व व्यक्तिना पंधरा दिवस घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.

या वेळी नाशिक जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद पवार,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ चेतन काळे,लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ एस डी सूर्यवंशी,कोविड सेंटरचे डॉ राजाराम शेंद्रे,निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ साहेबराव गावले,निफाड उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ रोहन मोरे,डॉ बाळकृष्ण अहिरे तसेच आरोग्य सेवक व आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.