लासलगाव : अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या आरोपीला 4 वर्षांची शिक्षा, 1 लाखाचा दंड

लासलगाव : पोलीनामा ऑनलाइन –  निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजिक येथील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवुन अश्लील फोटो काढले. तसेच लग्नास नकार देऊन फोटो सोशल साईटसवर व्हायलर केले. या आरोपावरून आरोपी आकाश नागेश सोनवणे यास निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी चार वर्षांची शिक्षा तर विनयभंगासह पोस्को कायद्याच्या कलमान्वये एक लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. निफाड येथील न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या दंडाच्या रक्कमेतील दहा हजार रूपये शासनास तर नव्वद हजार रुपये पीडितेस देण्याचे आदेश आदेश देण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, 2018 मध्ये पिंपळगाव नजिक येथील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमीष दाखवुन तिचे अश्लील फोटो काढले व या मुलीने लग्नास नकार दिल्यावर फोटो व्हायरल केले. या बाबत मुलीच्या वडीलांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार लासलगाव पोलिस ठाण्यात भादंवि कलम 353 व पोस्को कायद्यान्वये विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी तत्कालीन निफाडचे पोलिस निरीक्षक रणजित डेरे व लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी गुन्हा दाखल करून संशयीत आकाश नागेश सोनवणे याला अटक केली. आरोपीविरुद्ध निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्यात आरोपी आकाश सोनवणे हा दोन वर्षापासून कारागृहात आहे. या खटल्यात निफाड येथील जिल्हा सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. रमेश कापसे यांनी महत्वाचे सतरा साक्षीदार तपासले.

या खटल्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी आकाश नागेश सोनवणे यास दोषी धरून लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण कायदा 2012 चे कलम 8 व 12 नुसार चार वर्षांची सक्तमजुरी व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा, लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण कायदा 2012 चे कलम 12 नुसार 3 वर्षांची सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास तीन महीने सक्तमजुरीची शिक्षा, भादंवि कलम 354 नुसार तीन वर्षे शिक्षा व पाच हजार रूपयाचा दंड व दंड न भरल्यास तीन महीने सक्तमजुरीची शिक्षा, माहीती व तंत्रज्ञान अधिनियम 2002 चे कलम 67 नुसार 4 वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास सहा महीने सक्तमजुरी तसेच माहीती व तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 नुसार तीन वर्षे सक्तमजुरी व 30 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

सुमारे एक लाख रूपयाचे दंडाचे रक्कमेपैकी दहा हजार रूपये सरकार जमा व नव्वद हजार रूपये पिडितेस देण्याचे आदेश न्यायाधीश आर .जी. वाघमारे यांनी दिले. या खटल्यात सरकारच्या वतीने जिल्हा सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून अॅड. रमेश कापसे यांनी काम पाहिले. तर लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे व पैरवी कर्मचारी म्हणून हवालदार जी.डी. ठाकुर यांनी साक्षीदार व पुरावे सादर करण्याचे काम पाहीले.