लासलगाव : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात हरीण ठार

लासलगाव – बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पिंपळगाव नजीक येथील तुकाराम जाधव यांच्या मळ्यात हरणाच्या मादीला मोकाट कुत्र्यांनी गळ्याला चावा घेऊन गंभीर जखमी करून ठार केल्याची घटना घडल्याची माहिती येथील पोलीस पाटील भरत फंड यांनी पशुपक्षी मित्र गणेश ठाकरे यांना दिली.घटनेची माहिती मिळताच गणेश ठाकरे यांनी येवला वनविभागाचे भैया शेख यांना या घटनेबाबत तात्काळ भ्रमरध्वनी द्वारे माहिती दिली.

पिंपळगाव नजीक परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा तसा वावर नसल्याने ही मादी जातीची हरीण या परिसरामध्ये कुठून आणि कशी आली याबाबत चर्चा होताना दिसून आली.हरीण या परिसरामध्ये पहिल्यांदाच आढळून आल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांकडून मिळाली.वाहेगाव,टाकळी विंचूर,पिंपळद परिसरामध्ये मोरांचा वावर मोठ्याप्रणावर आहे परंतु हरणांचा नाही.कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी हरीण मादी मृत्यू पावल्याची ही पहिलीच घटना आहे.

या घटनेची माहिती वनविभागाचे वनसेवक भैया शेख याना मिळताच सहकारी भरत माळी यांचे समवेत तात्काळ घटनास्थळी हजर झाले.त्यांनी मृत हरणाचे शव पुढील उतरिय तपासणी साठी निफाड वनविभाग येथे शासकीय वाहनातून घेऊन गेले.या वेळी पोलीस पाटील भरत फंड,भास्कर जाधव,तुकाराम जाधव,गणेश गोरणे,आत्माराम जाधव आदी शेतकऱ्यांनी या कामी मदत केली.