Lasalgaon : 5Gच्या युगातही अमावस्याला बंद रहाते बाजार समितीत

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  –   कांदा आणि लासलगाव हे समीकरण गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत चर्चेत असणारे आहे. लासलगाव बाजार समिती ही कांद्याची देशांतर्गत नव्हे तर आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजार पेठे म्हणून ओळखली जाते. जगातील ७६ देशांमध्ये दरवर्षी करोडो रुपयांचा कांदा याच बाजार समितीतून निर्यात केला जातो. मात्र याच बाजार समितीत एक प्रचलित काळापासून परंपरा अवलंबली जात आहे ती म्हणजे दर अमावस्येला कांदा व धान्यची लिलाव बंद ठेवण्याची . ही परंपरा का आणि कशासाठी याबाबत उत्तर कोणाकडे ही नाही हे मात्र विशेष आहे. पण परंपरेचे काटेकोरपणे पालन केले जाते यात तिळमात्र शंका नाही.

२१ वे शतक हे ५ जी कडे या आधुनिक तंत्रज्ञानकडे जात आहे. देशात पेपरलेस कार्यप्रणाली,ऑनलाईन आदी गोष्टीकडे वाटचाल सुरू असताना मात्र आशिया खंडातील नावाजलेली कांदा नगरी अमावस्येला कांदा व धान्यची लिलाव बंद ठेवण्याची परंपरा पाळत आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारच्यावतीने प्रत्येक राज्यांमध्ये बाजार समितीची राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली स्थापना करण्यात आली १ एप्रिल १९४७ मध्ये लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली तेव्हापासून ते आजपर्यंत कांद्याच्या बाबतीत बाजार समितीने नावलौकिक कमवले आहे. आधुनिक वाहनांची उपलब्धता नसल्याने बैलगाड्यांमधून कांदा व धान्य विक्रीसाठी येत असे. महिन्याच्या दर अमावस्येला आपल्यावर काही विपदा येऊ नये म्हणून व्यापारी, शेतकरी आणि हमाल मापारी हे बाजार समितीच्या आवारातील कांदा व धान्य लिलावाच्या कामकाजात सहभागी होत नसल्याने कांद्याचे व धान्य लिलाव बंद ठेवले जात होती.