Lasalgaon News : कांदानगरीच्या चुरशीच्या लढतीत 66.03 % मतदान

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  –  संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले असलेल्या लासलगाव येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शांततेत पण चुरशीने ६६.०३ टक्के मतदान झाले. १७ जागेसाठी ३८ उमेदवार आपले नशीब आजमावत आहे.१३ हजार ९४५ मतदार असलेल्या आशिया खंडातील कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बाजारपेठेच्या लासलगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बाजार समितीचे आजी माजी सभापती निवडणूकीच्या मैदानात उतरल्याने अत्यंत प्रतिष्ठेची झाली असून मागील पंचवार्षिकच्या तुलनेत १२३९ नवीन मतदारांची वाढ झाली आहे. या निवडणुकीमध्ये जयदत्त होळकर आणि नानासाहेब पाटील यांचे ग्रामविकास पॅनल असून त्यांनी कल्याणराव पाटील आणि डिके जगताप यांच्या परिवर्तन शहर विकास आघाडीला आव्हान दिले आहे . यावेळी ग्रामविकास की परिवर्तन हे सोमवार दिनांक १८ रोजीच्या मतमोजणीनंतर ठरणार आहे.

सकाळपासून मतदान केंद्रावर चांगला उत्साह दिसत होता. लासलगाव ग्रामपालिकेच्या १३९४५ मतदारांपैकी ९२०९ मतदारांनी आपला हक्क बजवला आहे.या वेळी मतदान प्रक्रिया शांततेत आणि चुरशीने पार पडली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. प्रत्येक उमेदवार व कार्यकर्ते आपले मताधिक्य वाढावे यासाठी धडपड करताना दिसत होते. मतदानासाठी वारंवार मतदारांशी संपर्क साधत होते. अपंग व वृद्ध मतदारांसाठी व्हीलचेअरची सोय करण्यात आली होती. कोरोना पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदारांना मास्कची सक्ती केली तर आलेल्या प्रत्येक मतदारांचे तापमान चेक करत सोडले जात होते.

येथील मतदान केंद्रावर लासलगाव पोलिस ठाण्याचे सपोनि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.