लासलगाव : कांदा निर्यातबंदी हटवण्याची मागणी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या दीड महिन्यात कांद्याच्या दरामध्ये 5300 रुपयाची घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. नवीन कांद्याची आवक वाढल्याने कांद्याची घसरण थांबविण्यासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि खासदार भारती पवार यांना पत्रव्यवहार करून कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्याची मागणी केली आहे.

दिनांक २० ऑक्टोंबर २०२० रोजी पुन्हा कांद्याला सरासरी ७१०० रुपये प्रति क्विंटल झाला आणि तोच कांदा आता १८०० रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे गेल्या ४५ दिवसांमध्ये कांदा दरांमध्ये 295 टक्के घट झाल्याचे दिसून आले. या हंगामात अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने कांदा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे याकरिता बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र व्यवहार करून कांद्याचे बाजारभाव स्थिर व्हावे या हेतूने कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी अशी मागणी केलेली आहे.