लासलगांव बाजार समितीतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 25 लाखांची मदत : सुवर्णा जगताप.

लासलगांव :- राज्यात कोरोना विषाणुची लागण मोठ्या प्रमाणात झाली असुन त्या अनुषंगाने शासन स्तरावर विविध घटकांसाठी ज्या उपाययोजना केल्या जात आहे. त्यासाठी लासलगांव बाजार समितीतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रू. 25 लाखांची मदत दिल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी सदर निधी वितरण कार्यक्रमाप्रसंगी दिली.

जागतिक आरोग्य संघटनेने जगभर पसरलेला साथीचा रोग म्हणुन घोषित केलेला कोविड-19 (कोरोना विषाणु) देशात तसेच राज्यात झपाट्याने संक्रमित होत असुन त्यामुळे राज्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात दि. 24 मार्च, 2020 पासुन लॉकडाऊन जाहीर केल्याने कोरोना ग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात लागणारी औषधे, मास्क, सॅनिटायझर तसेच कोरोना ग्रस्तांना हाताळण्यासाठी आवश्यक असणारे इतर साहीत्य आणि राज्यात असलेले मजुर किंवा आर्थिक दुर्बल घटकातील जनता, त्याचप्रमाणे उद्योग व्यवसायात काम करणा-या कामगारांची रोजच्या भोजनाची, तसेच राहण्याची व्यवस्था करण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी राज्य शासनास मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने राज्यातील सर्व सहकारी संस्था, वित्तीय संस्था, बाजार समित्या इ. कडुन भरीव आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले आहे.

त्यानुसार लासलगांव बाजार समितीने एक सामाजिक बांधिलकीच्या भावनेतुन या बिकट प्रसंगी राज्य शासनास आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, कोविड-19 साठी रू. 25 लाखांचा धनादेश निफाड तालुक्याचे आमदार दिलीपराव बनकर, उपविभागीय दंडाधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसिलदार दीपक पाटील यांचेकडे बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आला.

बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारातील शेतकरी निवासचे हॉलमध्ये आयोजित सदर कार्यक्रमाप्रसंगी नाशिकच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अरूंधती राय, निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड्डी, निफाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड, निफाडचे सहाय्यक निबंधक अभिजीत देशपांडे, जिल्हा परीषद सदस्य डी. के. (नाना) जगताप, बाजार समितीचे सदस्य राजेंद्र डोखळे, रमेश पालवे, सचिव नरेंद्र वाढवणे, सहाय्यक सचिव प्रकाश कुमावत, निफाडचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप, लासलगावचे पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, सायखेडयाचे पोलीस निरीक्षक आशिष अडसुळ, निफाड उपबाजार आवाराचे प्रभारी दिनकर खालकर, निफाड देखरेख संघाचे मा. चेअरमन माधव सुरवाडे, सुरेश कापसे, बाजार समितीचे सेवक वाल्मिक जाधव, विजयेंद्र काकवीपुरे, रामनाथ गोळे, नंदू खडताळे, विनायक फलके, बापू धारराव, नितीन सुरवाडे, साईनाथ सालमुठे, हरी गभाले आदींसह परीसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिल डचके यांनी केले तर आभार नरेंद्र वाढवणे यांनी मानले.