लासलगाव बाजार समितीत 8 दिवसानंतर कांदा लिलाव पुर्ववत

लासलगाव  : वार्ताहर –  येथील बाजार समितीमध्ये दोन व्यापाऱ्यांना कोरोणाची लागण झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेल्या बाजार समितीत आज कांदा आणि धान्य लिलावाला सुरुवात झाली. आज उन्हाळ कांद्याला सरासरी 750 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. त्याचा परिणाम शेतमालावरही दिसत आहे. सध्या कांद्याची मागणी घटली असून, साठवलेला कांदा सडत असल्याने आवक वाढली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हॉटेल व्यवसाय ठप्प होता. त्यामुळे कांद्याच्या मागणीत मोठी घट झाली. घरगुती वापरासाठी लागणारा कांदाविक्री सुरू असली, तरी कांद्याच्या दरात अद्याप समाधानकारक सुधारणा झालेली नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतकरी कांद्याच्या दरात वाढ होण्याची वाट पाहत आहेत. परंतु, यंदा कमी कालावधीत कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांचाही नाईलाज झाला आहे. कमी दरात कांद्याची विक्री करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कांद्याला चांगला दर मिळेल, या आशेवर शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला.मात्र कांदा दरामध्ये सुधारणा होत नसल्याने कांद्याची साठवण करुन फायदा झाला नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करतात.

आज येथील मुख्य बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची बाराशे वाहनांद्वारे १८ हजार क्विंटल आवक होऊन उन्हाळ कांद्याला कमीतकमी ४०० जास्तीत जास्त ९७० रुपये , सरासरी ७५० भाव मिळाले

खरिपांच्या पिकांसाठी कांदाविक्री

खरीपाची लगबग सुरू झाल्याने शेतीपूरक साहित्य खरेदी सुरू आहे. बियाणे, खते, किटकनाशके खरेदीसाठी पैशाची गरज भासत आहे. त्यामुळेही शेतकरी साठवलेला कांदा कमी दराने विक्री करीत आहेत. कांद्याची झालेली नासाडी आणि कमी दराने विक्री, यामुळे शेतकऱ्यांना यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे. साठवलेल्या कांदाविक्रीतून खर्चही निघत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करतात.